Corona virus : धक्कादायक ! दहा लाख लोकांसाठी फक्त ५०० डॉक्टर; कोरोनाकाळातील भयावह वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 02:20 PM2020-07-09T14:20:31+5:302020-07-09T14:37:54+5:30
केंद्र व राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे देशात कोरोनाकाळात लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांचा तुटवडा भासत आहे..
राहुल शिंदे
पुणे: केंद्र व राज्य शासनाने वैद्यकीय क्षेत्राकडे केलेल्या दुर्लक्षामुळे सध्या कोरोना बाधित रुग्णांसाठी बेडचा व त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा तुटवडा भासत आहे.'डब्ल्यूएचओ'च्या निकषानुसार १० लाख लोकसंख्येमागे १ हजार २०० डॉक्टर आवश्यक आहेत.परंतु, सध्या देशात हे प्रमाण केवळ ५०० पर्यंत आहे. त्यामुळे देशात व राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची व रुग्णालयांची संख्या वाढवावी लागणार आहे.
महाराष्ट्रात एकूण ५६ वैद्यकीय महाविद्यालय असून त्यात शासकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या सुमारे ४ हजार ३३० तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुमारे ४ हजार ५७० जागा उपलब्ध आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या तुलनेत या जागा खूप कमी आहेत. त्यातही डेंटल कॉलेजचा विचार केला तर महाराष्ट्रात ३७ डेंटल कॉलेज असून त्यांची प्रवेश क्षमता ३ हजार ४४४ इतकी आहे. त्यातील शासकीय महाविद्यालयाच्या जागा केवळ २९४ एवढ्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राचे खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते.
इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे म्हणाले, गेल्या काही दशकांपासून केंद्र व राज्य शासनाने वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक निधी खर्च केला नाही. केंद्र शासनाने राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) पाच टक्के रक्कम वैद्यकीय क्षेत्राच्या विकासासाठी खर्च करणे आवश्यक आहे. मात्र, केंद्र शासनाकडून केवळ एक टक्का तर महाराष्ट्रकडून अर्धा टक्का रक्कम खर्चच केली जाते. ही सर्व रक्कम वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होते. पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही.
वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक्रम हरीश बुटले म्हणाले, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाईल, अशी भूमिका शासनाने घेतली होती. परंतु, त्याची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसत नाही. बुलढाणा, भंडारा ,गडचिरोली, वाशिम ,जालना, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये अद्याप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालेले नाही. इतर जिल्ह्यांमध्ये खाजगी किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे.
------------------
भारतात ५३२ वैद्यकीय महाविद्यालय असून त्यांची एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ७६ हजार ९२८ एवढी आहे. त्यातील शासकीय महाविद्यालयांची संख्या २७२ असून त्यांची प्रवेश क्षमता ४१ हजार ३८८ एवढी आहे. तर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या २६० असून त्यांची प्रवेश क्षमता ३५ हजार ५४० एवढी आहे.
-----------------------
देशातील सव्वाशे कोटीहून अधिक असणाऱ्या लोकसंख्येसाठी ३० लाखांपर्यंत डॉक्टरची आवश्यकता आहे.परंतु,सध्या देशात केवळ १० लाख डॉक्टर आहेत. देशातील व महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवून रिक्त असणार्या प्राध्यापकांच्या व अधिका-यांच्या जागा भरण्याची आवश्यकता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत पाठपुरावा करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. -डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र राज्य
---------------------
महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता साडेआठ हजाराहून अधिक आहे. परंतु ,महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा कमी असून त्यात आणखी ४ हजार जागांची वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी नवीन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करावे लागतील.
-----------
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागांचा विचार केला.तर महाराष्ट्रात सुमारे ४ हजार १३० जागा शासकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यातील १५ टक्के जागा नॅशनल कोट्यासाठी राखीव ठेवल्या जातात.त्यामुळे ६२० जागा वजा करून महाराष्ट्रातील मुलांसाठी केवळ 3 हजार 510 जागा उपलब्ध राहतात. कोट्यवधी रुपये खर्च करून खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणे शक्य नसल्याने गरीब विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमापासून वंचित राहत आहेत. - हरीश बुटले, वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक्रम