Corona Cases India : धोक्याची घंटा! 117 दिवसांनंतर देशात दररोज 600 हून अधिक नवे कोरोना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 01:11 PM2023-03-15T13:11:13+5:302023-03-15T13:12:32+5:30

Corona Cases India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 618 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर एका दिवसापूर्वी कोरोनाची 402 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

corona virus return single day rise of over 600 covid-19 cases after 117 days union health ministry death rate | Corona Cases India : धोक्याची घंटा! 117 दिवसांनंतर देशात दररोज 600 हून अधिक नवे कोरोना रुग्ण

Corona Cases India : धोक्याची घंटा! 117 दिवसांनंतर देशात दररोज 600 हून अधिक नवे कोरोना रुग्ण

googlenewsNext

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 618 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर एका दिवसापूर्वी कोरोनाची 402 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 

कालच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत व्हायरसच्या संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये 200 हून अधिक प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत एकाच दिवसात कोरोना व्हायरसची 618 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. 600 हून अधिक नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4,46,91,956 झाली आहे. तर 117 दिवसांनंतर देशात दररोज 600 हून अधिक कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. 

सध्या देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या  4,197 झाली आहे. गेल्या वर्षी 18 नोव्हेंबर रोजी देशात एकाच दिवसात कोरोना संसर्गाचे 656 रुग्ण आढळले होते. तर काल मंगळवारी कोरोनाचे 402 नवीन रुग्ण आढळले. दुसरीकडे, सोमवारी देखील देशात कोरोनाची 444 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. त्याचप्रमाणे रविवारी, 10 मार्च रोजी एकाच दिवसात कोरोनाच्या 440 नवीन रुग्णांची नोंद झाली. 

10 मार्चपासून देशात सतत कोरोनाची 400 हून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. आता हा आकडा 600 च्या पुढे गेला आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना संसर्गामुळे आणखी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाच जणांच्या मृत्यूनंतर देशातील कोरोनामुळे मृतांची संख्या 5,30,789 झाली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रत्येकी दोन आणि उत्तराखंडमध्ये एका व्यक्तीचा संसर्गामुळे मृत्यू झाला.

आतापर्यंत 220.64 कोटी लोकांनी घेतले डोस 
आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 4,41,56,970 लोक कोरोना संसर्गापासून मुक्त झाले आहेत, तर कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.80 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशभरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना विरोधी लसीचे 220.64 कोटी डोस देण्यात आले आहेत.

Web Title: corona virus return single day rise of over 600 covid-19 cases after 117 days union health ministry death rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.