Corona Virus: ...तर कोरोनाची तीव्र लाट येण्याची चिंता, शास्त्रज्ञ चिंतित; प्रतिकारशक्तीची परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 06:17 AM2021-11-28T06:17:21+5:302021-11-28T06:17:46+5:30
Corona Virus:
नवी दिल्ली : कोणतेही विषाणू माणसांच्या शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी स्पाइक प्रोटिनचा वापर करतात. लसीमुळे शरीर या स्पाइकला ओळखून त्याला निष्प्रभ करण्याची तयारी करते. ओमिक्रॉन विषाणूच्या स्पाइक प्रोटिनमध्ये आतापर्यंत अनेक परिवर्तने झाली आहेत. ओमिक्रॉनमधील या परिवर्तनांनी शरीरातील प्रतिकारशक्तीला दाद न दिल्यास भविष्यात कोरोनाची तीव्र लाट येण्याची चिंता शास्त्रज्ञांना सतावत आहे.
ओमिक्राॅन हा नवा कोरोना विषाणू सापडून अजून आठवडाही झालेला नाही. साधारण आठवडाभरानंतर या विषाणूच्या स्वरूपाबाबत आणखी माहिती शास्त्रज्ञांच्या हाती येईल. त्यातून या विषाणूचा प्रतिकारशक्तीवर काय परिणाम होतो याचा सखोल अभ्यास करता येईल. विदेशी प्रवाशांच्या माध्यमातून हा विषाणू जगभर पसरण्याची शक्यता आहे.
चाचणीत बदल होण्याची शक्यता
ओमिक्रॉन या विषाणूचे रुग्णाच्या शरीरातील अस्तित्व शोधण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी सध्या करण्यात येते. या विषाणूत आणखी परिवर्तने झाल्यास चाचणीची पध्दतही काही प्रमाणात बदलावी लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनेही आता संशोधकांनी विचार सुरू केला आहे.
२७ युरोपीय देशांनी आफ्रिका देशांशी संलग्न आंतरराष्ट्रीय विमानसेवा सध्या स्थगित केली आहे.
१२ देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांची अधिक बारकाईने तपासणी करण्यात येईल.
दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, झिम्बाब्वे, नामिबिया, लेसोते, इस्वातिनी, मोझांबिक, मलावी या आठ देशांतील प्रवाशांवर अमेरिकेची बंदी.