Coronavirus: देशात कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही, ८ राज्यांमध्ये 'R' फॅक्टर अधिक; आरोग्य मंत्रालयाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 06:34 PM2021-08-03T18:34:34+5:302021-08-03T18:35:17+5:30
Coronavirus In India: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी पत्रकार परिषद घेत एक महत्वाची माहिती दिली आहे.
Coronavirus In India: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी पत्रकार परिषद घेत एक महत्वाची माहिती दिली आहे. देशातील १८ जिल्ह्यांमध्ये गेल्या ४ आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसून आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. या १८ जिल्ह्यांमध्ये देशातील एकूण रुग्णांपैकी ४७.५ टक्के रुग्ण आहेत. केरळमधील १० जिल्ह्यांमध्ये गेल्या एका आठवड्यात ४०.६ टक्के कोरोना रुग्ण आढळले आहेत. (Corona virus second wave is still not over, R number is high in 8 states says Lav Agarwal)
देशात १० मे रोजी ३७ लाख सक्रीय रुग्ण होते त्यात आज घट होऊन ४ लाखांवर संख्या आली आहे. देशातील एका राज्यात सध्या १ लाखाहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. तर ८ राज्य अशी आहेत की जिथं सध्या १० हजाराहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. तर २७ राज्यांमध्ये १० हजारापेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. देशात १ जून रोजी २७९ जिह्ल्यांमध्ये दर दिवशी १०० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. पण असे जिल्हे आता कमी होऊन ५७ वर आले आहेत. २२२ जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीवर ब्रेक लागला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
४४ जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हीटी दर
देशात सध्या ४४ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक असल्याचंही अग्रवाल यांनी सांगितलं. हे जिल्हे केरळ, मणिपूर, मिझोराम आणि नागालँडमध्ये आहेत. जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे आणि अजूनही लढाई संपलेली नाही. भारतात अद्याप दुसरी लाट संपलेली नाही. देशात R फॅक्टर म्हणजेच रिप्रोडक्शनचा वापर करुन वाढीचा दर आणि सक्रीय रुग्णांचा अभ्यास करण्यात येतो. यातून देशात कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही हे लक्षात येतं, असंही लव अग्रवाल म्हणाले.