लॉकडाऊनदरम्यान सीमेवर तैनात असलेल्या जवानाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोलिसांनी केले असे काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 04:08 PM2020-04-30T16:08:51+5:302020-04-30T16:13:39+5:30
देशसेवेसाठी सीमेवर तैनात असलेल्या एका अशाच एका जवानाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गावातील पोलिसांनी जे काही केले त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
मथुरा - लॉकडाऊनदरम्यान संपूर्ण देश घरात बंद असला तरी काहीजण मात्र आपले घर आणि कुटुंबीयांपासून दूर राहून देशसेवेत गुंतलेले आहे. यात कोरोनाविरोधात लढत असलेले आरोग्यसेवक पोलीस आणि भारतीय लष्करातील जवानांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. देशसेवेसाठी सीमेवर तैनात असलेल्या एका अशाच एका जवानाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गावातील पोलिसांनी जे काही केले त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील गोविंदनगर परिसरात राहणारा एक जवान सध्या सीमेवर तैनात आहे. दरम्यान, या जवानाच्या मुलीचा वाढदिवस नुकताच होता. दरम्यान, लॉकडाऊनमुळे या जवानाला मुलीच्या वाढदिवसासाठी येणे तसेच मुलीला भेटवस्तू पाठवणे शक्य नव्हते.
त्यामुळे आता आपल्या मुलीचा वाढदिवस कसा साजरा करता येईल, अशा आशयाचा मेसेज या जवानाच्या पत्नीने उत्तर प्रदेश पोलीस आणि मथुरा येथील पोलीस अधिकाऱ्यांचे नाव घेत सोशल मीडियावर शेअर केला होता.
दरम्यान, या मुलीच्या वाढदिवसासाठी चक्क स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी केक, फुगे आणि भेटवस्तू घेऊन पोहोचले. तीन कार आणि अनेक दुचाकींसह यूपी-११२ सेवेतील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी जेव्हा या जवानाच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला.
त्यानंतर या पोलिसांनी या मुलीचा वाढदिवस मुलीची आई आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत केक कापून साजरा केला. दरम्यान, आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस अविस्मरणीय बनवल्याबद्दल या मुलीच्या कुटुंबीयांनी आभार मानले.