Corona Virus: कोरोनाग्रस्त संशयित रुग्ण हॉस्पिटलमधूनच बेपत्ता; पोलिसांत तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 03:18 AM2020-03-10T03:18:40+5:302020-03-10T03:19:10+5:30
शहरातील अनेक औषधांच्या दुकानांत मास्क आणि हँड सॅनिटायझर्स संपल्यामुळे मिळाले नसल्याची तक्रार काही महिलांनी केली.
मंगळुरू : दुबईहून कर्नाटकमधील मंगळुरू येथे विमानाने आलेला व कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेला एक रुग्ण तेथील रुग्णालयातून बेपत्ता झाला आहे. या प्रकाराने खळबळ माजली असून त्या व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
हा संशयित रुग्ण जनतेत वावरल्यास त्यामुळे अनर्थही घडू शकतो. त्यामुळेच तो लवकरात लवकर सापडणे आवश्यक आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे. दुबईहून गेल्या रविवारी मंगळुरूमध्ये आलेल्या या व्यक्तीला वेनलॉक रुग्णालयातील स्वतंत्र कक्षामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, आपण खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ, असे सांगत या रुग्णाने वेनलॉक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी वादावादी केली होती. त्यानंतर तो तिथून निघून गेला.
या रुग्णाला २४ तास वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल व त्याच्या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर डिसचार्ज देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे दक्षिण कन्नडा जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी सिकंदर पाशा यांनी याआधी सांगितले होते. हा रुग्ण बेपत्ता झाल्याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
बायोमेट्रिक हजेरी तात्पुरती बंद
कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता कर्मचाºयांची हजेरी लावण्यासाठी बायोमेट्रिक यंत्राचा ३१ मार्चपर्यंत वापर न करण्याचे राष्ट्रीय हरित लवादाने ठरविले आहे. तसा आदेश लवादाने जारी केला. या कालावधीत कार्यालयात आलेल्या कर्मचाºयाने रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करून आपली हजेरी नोंदवायची आहे. हजेरीसाठी काही काळ बायोमेट्रिक यंत्र वापरू नका, असा आदेश दिल्ली सरकारनेही आपल्या विविध खात्यांना दिला आहे.
‘अत्तुकाल पोंगला’मध्ये लाखो महिलांचा सहभाग
केरळ राज्यात आणखी सहा जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर व सरकारने कठोर नियम घालून दिल्यानंतरही ‘अत्तुकाल पोंगला’ या महिलांसाठीच्या वार्षिक समारंभात येथे काही लाख महिलांनी सोमवारी उत्साहाने भाग घेतला. केरळमध्ये हा महिलांसाठीचा सगळ्यात मोठा धार्मिक समारंभ आहे.
शहरातील अनेक औषधांच्या दुकानांत मास्क आणि हँड सॅनिटायझर्स संपल्यामुळे मिळाले नसल्याची तक्रार काही महिलांनी केली. येथील अत्तुकल भावावथी मंदिर हे महिलांचे सबरीमाला म्हणून प्रसिद्ध आहे. पोंगला हा प्रसाद करण्यात फक्त महिलांचाच सहभाग असतो. कोचीमध्ये तीन वर्षांच्या मुलाला या विषाणूची बाधा झाली असल्याचे अधिकाºयांनी सोमवारी सांगितले.