Corona virus : कोरोनावरील लस निर्मितीची घाई नाही; आमचा भर लसीची परिणामकारकता व सुरक्षेवर : आदर पुनावाला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 05:34 PM2020-07-07T17:34:34+5:302020-07-07T18:13:13+5:30
लस निर्मितीसाठी अजून सहा महिन्यांचा कालावधी लागेल...
पुणे : भारतात कोरोनावरील लस आणण्याची घाई सुरू असल्याची बातमी होती. पण आम्हाला लस निर्मिती करण्याची घाई नाही. आमचा भर लसीची परिणामकारकता व सुरक्षेवर आहे. लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच भारत व जगातील इतर देशांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी अजून सहा महिन्यांचा कालावधी लागेल,असे स्पष्ट करत सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थे (आयसीएमआर) कडून होत असलेल्या आततायीपणावर अप्रत्यक्ष टीका केली.
राष्ट्रीय विषाणु संस्था (एनआयव्ही) व भारत बायोटेक या कंपनीने संयुक्तपणे लस विकसित केली आहे. ही भारतातील पहिलीच लस ठरली आहे. या लसीच्या मानवी चाचणीला परवानगी मिळाली असून लवकरच चाचण्या सुरू होतील. विकसित केलेली लस १५ आॅगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्याबाबत 'आयसीएमआर' कडून दावा करण्यात आला आहे.
लस उपलब्ध होईपर्यंत कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, चाचण्या वाढविल्यास बाधित लोकांना विलग करणे शक्य होईल. त्यामुळे प्रसाराला आळा बसू शकेल. दररोज बाधित लोकांचा आकडा वाढणे, हे धोकादायक नाही. तर मृत्यूदर वाढणे हे धोक्याचे आहे. त्यासाठी चाचण्या वाढवून गंभीर लोकांवर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. आपण याप्रमाणाच्या जवळपासही नाही. माय लॅबची दर आठवड्याला २० लाख चाचणी कीट निर्मिती क्षमता आहे. पण मागणी अभावी त्याच्या निम्मीही निर्मिती होत नाही. दुसरीकडे केंद्र शासनाकडून नियार्तीलाही परवानगी नाही. आपण निर्यात करून भारतासाठी पुरेल एवढा कीटचा साठा उपलब्ध करून देऊ शकतो. चाचणीसाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र अडथळा ठरत आहे. ज्या लोकांना लक्षणे नाहीत त्यांना चाचणी करता येत नाही. सिरमसह अनेक कंपन्यांना कर्मचाºयांच्या चाचण्या करायच्या आहेत. पण ते शक्य होत नाही.