Corona Virus : दुसऱ्या लाटेसारखी कोविडची तिसरी लाट नसणार विनाशकारी, केंद्र सरकारच्या आरोग्य तज्ज्ञांचे मत; सणासुदीत नियम पाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 05:25 AM2021-10-24T05:25:16+5:302021-10-24T05:25:38+5:30
Corona Virus : दुसरी लाट शिखरावर असताना ७ मे रोजी २४ तासातील कोविड रुग्णसंख्या तब्बल ४.१४ लाख होती. ती आता २० हजाराच्याही खाली आली आहे. त्यातच कोविड लस मात्रांनी १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
नवी दिल्ली : मागील काही महिन्यापासून भारतात सुरू असलेल्या जोरदार लसीकरणामुळे कोरोनावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात आले असून, तिसरी लाट आलीच तर ती दुसऱ्या लाटेसारखी विनाशकारी असणार नाही, असे मत भारत सरकारच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र खबरदारी म्हणून सणासुदीच्या काळात नागरिकांनी सुरक्षात्मक उपायांचे काटेकोर पालन करायला हवे, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
दुसरी लाट शिखरावर असताना ७ मे रोजी २४ तासातील कोविड रुग्णसंख्या तब्बल ४.१४ लाख होती. ती आता २० हजाराच्याही खाली आली आहे. त्यातच कोविड लस मात्रांनी १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे आगामी काळात तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेएवढी विनाशकारी असणार नाही, असे तज्ज्ञांना वाटते. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीच्या आधारे जागतिक आरोग्य संघटनेने (हू) भारतातील सुधारलेल्या स्थितीबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
हूच्या अहवालानुसार, काही अपवाद वगळता बहुतांश मोठ्या राज्यातील स्थिती नियंत्रणात आहे. केरळातील स्थिती अजूनही चिंताजनक आहे. १३ ते १९ ऑक्टोबर या आठवड्यात केरळातील ३० जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ५६ टक्के रुग्ण महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यातील
आहेत.
१६,३२६ जणांना कोरोनाचा संसर्ग; ६६६ जणांचा मृत्यू
शनिवारी हाती आलेल्या अहवालानुसार, देशात १६,३२६ जणांना कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झाला असून आता एकूण बाधितांची संख्या ३,४१,५९,५६२ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १,७३,७२८ असून हा २३३ दिवसांतील नीचांक ठरला.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी ६६६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आता ४,५३,७०८ झाला आहे.
सलग २९ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ३० हजारांच्या आत, तर ११८ दिवसांपासून ५० हजारांच्या आत राहिली आहे. शुक्रवारी १३,६४,६८१ कोविड टेस्ट करण्यात आल्या. त्याबरोबर एकूण टेस्टची संख्या ५९,८४,३१,१६२ झाली आहे. आजारातून बरे झालेल्यांची संख्या आता ३,३५,३२,१२६ झाली आहे. मृत्यूदर १.३३ टक्के झाला आहे. दरम्यान, देण्यात आलेल्या कोरोना लस मात्रांची संख्या १०१.३० कोटी झाली आहे.