कोरोनाचा धोका वाढला, जिनोम सिक्वेंसिंग करा; केंद्र सरकारचे राज्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 07:40 AM2022-12-21T07:40:12+5:302022-12-21T07:40:38+5:30
केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना पॉझिटिव्ह नमुन्यांची जिनोम सिक्वेंसिंग करण्याचे आवाहन केले आहे.
नवी दिल्ली : जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होत असताना केंद्र सरकारने खबरदारी म्हणून मंगळवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना पॉझिटिव्ह नमुन्यांची जिनोम सिक्वेंसिंग करण्याचे आवाहन केले आहे. यामुळेच विषाणूची प्रसाराची क्षमता किती आहे, याची माहिती मिळते व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होते.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, अशा प्रकारच्या चाचण्यांमुळे देशातील नवीन प्रकाराचा वेळेवर शोध घेणे शक्य होईल. जिनोम सिक्वेंसिंग ही अशी चाचणी आहे ज्यामध्ये आरएनए रेणुचा उपयोग करून आनुवंशिक माहिती मिळविली जाते. याशिवाय या विषाणूत किती बदल झाले आहेत, तो शरीरात कसा प्रवेश करतो आणि त्याची संसर्ग क्षमता काय आहे अशी सर्व माहिती यातून मिळते. देशात सध्या कोरोनाचे आठवड्याला १२०० रुग्ण आढळत आहेत. जगात सध्या आठवड्याला ३५ लाख प्रकरणे नोंदविली जात आहेत.