Corona Virus: कोरोनानं पुन्हा वाढवलं टेन्शन, 'या' राज्यात 24 जुलैपर्यंत सर्व शाळा बंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 12:09 PM2022-07-13T12:09:30+5:302022-07-13T12:11:23+5:30
या संदर्भात मणिपूर सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे...
कोरोना व्हायरलने पुन्हा एकदा टेन्शन वाढवायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मणिपूर सरकारने 24 जुलैपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढल्यामुळे मनिपूर सरकारने पुढील आठवड्यापर्यंत सर्व शाळा (Schools) बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. हा आधिकृत आदेश मंगळवारी जारी करण्यात आला. राज्यातील संक्रमण दर 15 टक्क्यांच्या पुढे गेला असल्याचे शालेय शिक्षण आयुक्त एच ज्ञान प्रकाश यांनी म्हटले आहे.
या संदर्भात मणिपूर सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. यात कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने आणि टेस्ट पॉझिटिव्हिटी रेटची सरासरी 15 टक्क्यांपेक्षा वर गेल्याने, 24 जुलैपर्यंत राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा बंद राहतील, असे म्हणण्यात आले आहे.
मणिपूरमध्ये मंगळवारी 59 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर सोमवारी येथे 47 नवे कोरोना बाधित समोर आले होते. राज्यातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत एकूण 15 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
काय आहे आदेशात? -
आदेशानुसार, सर्व सरकारी, अनुदानित, तसेच इतर बोर्डांशी संलग्न असलेल्या खासगी शाळा, सार्वजनिक हितासाठी 24 जुलैपर्यंत तात्काळ बंद करण्यात याव्या. येथे उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर 16 जुलैपासून अनेक शाळा सुरू होणार होत्या. तत्पूर्वी, मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह म्हणाले होते,की सरकार 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षितते संदर्भात चर्चा करेल. कारण, या वयोगटासाठी मणिपूरमध्ये सध्या कोणतीही अँटी-कोविड-19 लस उपलब्ध नाही.