"कोरोनावर जशी कोविशील्ड लस, तसंच भाजपा व्हायरसवर ममता बॅनर्जी हीच प्रभावी लस"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 03:41 PM2021-10-25T15:41:42+5:302021-10-25T15:42:08+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा भाचा आणि तृणणूल काँग्रेसचा खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी कूचबिहार जिल्ह्यातील दिनहाटा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपाच तुलना थेट कोरोना व्हायरससोबत केली आहे
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा भाचा आणि तृणणूल काँग्रेसचा खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी कूचबिहार जिल्ह्यातील दिनहाटा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपाच तुलना थेट कोरोना व्हायरससोबत केली आहे. ममता बॅनर्जी या कोरोना व्हायरसविरोधातील लसीसारख्या असल्याचंही ते म्हणाले आहेत. कोरोना व्हायसर विरोधात ज्याप्रमाणे कोविशील्ड लस आहे. तसंच भाजपा व्हायरसविरोधात ममता बॅनर्जी नावाची लस अत्यंत प्रभावी आहे, असं अभिषेक बॅनर्जी म्हणाले.
२०२४ मध्ये ममता बॅनर्जी संपूर्ण देशातून भाजपाचा सुपडासाफ करतील. लवकरच तृणमूल काँग्रेस पक्ष पाच राज्यांमध्ये विस्तारला जाणार असून गोव्यातही विधानसभा निवडणुकीत यश प्राप्त होईल, असा विश्वास अभिषेक बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार अभिषेक बॅनर्जी आता इतर राज्यांमध्ये पक्ष वाढीसाठी काम करत आहेत. त्रिपुरा, आसाम आणि गोव्यात टीएमसीनं पक्ष विस्ताराच्या योजनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. २८ ऑक्टोबर रोजी खुद्द ममता बॅनर्जी पाच दिवसांच्या गोवा दौऱ्यावर जाणार आहेत.
"बंगालमधील पोटनिवडणुकीवर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. भवानीपूर पोटनिवडणुकीवेळी तृणमूलनं ३-० नं विजय प्राप्त केला. आता ४-० ने जिंकू. ममता बॅनर्जी यांचा पाठिंबा आपल्याला आणखी मजबूत करायचा आहे. विकासाला मत दिलं गेलं पाहिजे. टीएमसी आता त्रिपुरा, गोवामध्येही पोहोचली आहे. येत्या काही काळात आणखी पाच राज्यांमध्ये तृणमूल पक्ष वाढेल. मेघालय, आसाम, उत्तर प्रदेशसह आणखी काही राज्यांमध्ये तृणमूलचं अस्तित्व दिसून येईल. गोव्यात तृणमूल काँग्रेस पक्ष सत्ता स्थापन करेल असा विश्वास आहे", असं अभिषेक बॅनर्जी म्हणाले.