Corona virus Vaccine : 'कोविशिल्ड' लस परिणामकारकच! आदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 09:28 PM2020-11-28T21:28:33+5:302020-11-28T21:29:30+5:30
लसीच्या क्षमतेवर निर्माण झालेला संभ्रम दूर...
पुणे : कोविशिल्ड लसीच्या चाचणीमध्ये परिणामकारकेतवर शिक्कामोर्तब झाले आहे. या लसीमुळे स्वयंसेवकांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण शुन्य आहे. तसेच लस टोचल्यानंतर संबंधित व्यक्तींची प्रतिकारशक्ती वाढत असून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता ६० टक्क्यांनी झाली आहे, असे स्पष्ट करत आदर पुनावाला यांनी लसीच्या क्षमतेवर निर्माण झालेला संभ्रम दूर केला.
अॅस्ट्रॉझेनेका कंपनीने जाहीर केलेल्या निष्कर्षानंतर वाढीव चाचण्या घेणार का, या प्रश्नावर बोलताना पुनावाला म्हणाले, अतिरिक्त चाचण्यांची गरज नाही. लसीची परिणामकारकतेच्या पुरेशा चाचण्या झाल्या आहेत. संवादातील गोंधळामुळे लसींच्या परिणामकारकतेबाबत संभ्रम निर्माण झाला. मात्र, भारतातील उत्पादनावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. काही महिन्यांनी १८ वर्ष वयोगटाखालील स्वयंसेवकांमध्ये लसीच्या चाचणीला सुरूवात केली जाईल.
लसीचे वितरण कुठे आणि कसे होणार याबाबत सरकारशी चर्चा सुरू आहे. सर्वांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल, असा दर कळविण्यात आला आहे. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. उत्पादन सातत्याने सुरू असल्याने लस वितरणामध्ये विलंब होणार नाही. दोन आठवड्यांनी मान्यता मिळाल्यास त्यादृष्टीने वितरण व डोसच्या संख्येत वाढ केली जाईल. पंतप्रधानांना लसींबाबत आधीपासूनच खुप माहिती होती. त्यामुळे आम्हालाच आश्चर्य वाटले. त्यामुळे फार माहिती त्यांना द्यावी लागली नाही. लसीचे वितरण, नियमन ही पुढील आव्हाने असतील. कमीत कमी वेळेत आतापर्यंत झालेल्या उत्पादनाची त्यांनी प्रशंसा केली. आम्ही उत्पादन वाढविण्यासाठी उभा केलेला तिसरा प्रकल्पही पंतप्रधानांनी पाहिला. या प्रकल्पामुळे वर्षभरात अब्जावधी डोस तयार होतील.
---------
कोविशिल्ड आणि कोव्होव्हॅक्स या दोन्ही लसींची साठवणुक व वाहतुक २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात करता येईल. त्यादृष्टीने भारताकडे पुरेशा पायाभुत सुविधा उपलब्ध आहेत. तर -२० पर्यंत साठवणुकीसाठी खुप कमी तर -७० अंशासाठी काहीच सुविधा नाहीत. यावरूनच पुढील काही महिन्यांत येणाऱ्या लसींबाबत साठवणुकीचा अंदाज बांधता येईल. अॅस्ट्रॉझेनेका लसीच्या तुलनेत नोव्हावॅक्स लसीची प्रक्रिया सुमारे दोन महिने मागे आहे. कोविशिल्डनंतर या लसीच्या चाचण्या सुरू झाल्या. तर कोडेजेनिक्सची पहिल्या टप्प्यातील चाचणी डिसेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये सुरू होणार असल्याने या लसीला आणखी एक वर्ष लागेल.
---------
सिरम संस्थेच्या टीमशी चांगला संवाद झाला. आतापर्यंतची लस निर्मितीतील प्रगती आणि भविष्यातील उत्पादन क्षमतेवर त्यांनी सखोल माहिती दिली. उत्पादन प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करता आली.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान