भारताच्या लसीनं जगाला कोरोनाच्या महासाथीतून वाचवलं; अमेरिकेच्या जेष्ठ वैज्ञानिकाकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 08:35 PM2021-03-07T20:35:44+5:302021-03-07T20:38:56+5:30
Coronavirus Vaccine : भारतानं आजवर अनेक देशांना केला लसींचा पुरवठा
गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या महासाथीनं संपूर्ण जगालाच थांबवलं होतं. जगातील सर्वच देशांची आर्थिक हानी तर झालीच पण त्यापेक्षाही अधिक मानव हानीदेखील मोठ्या प्रमाणात झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लसी विकसित करण्यास सुरूवात केली होती. भारतातही लस विकसित करण्याचे प्रयत्न दिवसरात्र सुरू होते. विक्रमी कालावधीत भारताला त्यात यशही मिळालं. भारतानं आपल्या देशात लसीकरण मोहीम सुरू केल्यानंतर अन्य देशांनाही लसीचा पुरवठा करण्यास सुरूवात केली. आताही भारताकडून अनेक देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा करण्यात येत आहे. भारताच्या या महान कार्याचं आता जगभरातून कौतुकही होऊ लागलं आहे. भारतात तयार झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीनं जगाला या मोठ्या महासाथीतून वाचवलं आहे. भारताचं हे योगदान कमी समजू नये, असं म्हणत अमेरिकेतील एका ज्येष्ठ वैज्ञानिकानं भारताचं कौतुक केलं आहे.
महासाथीदरम्यान औषध क्षेत्रात व्यापक अनुभव आणि ज्ञानामुळे भारताला 'फार्मसी ऑफ द वर्ल्ड' असं संबोधलं गेलं आहे. जगातील सर्वात मोठा औषध उत्पादक देश हा भारत आहे. तसंच कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या मोठ्या प्रमाणात खरेदीसाठीही अनेक देशांनी भारताशी संपर्क साधला आहे. भारतानं सपूर्ण देशाच्या मदतीसाठी पुढे येत तसंच विशेषत: गरीब देशांना मोफत लसीचा पुरवठा केला आहे.
भारताचं योगदान मोठं
"एमआरएनएच्या दोन डोसचा कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांवर प्रभाव पडत नाही. परंतु भारताच्या लसीनं जगाला वाचवलं आहे आणि हे योगदान कधीही कमी समजू नये," असं मत ह्युस्टनमधील बायलोर कॉलेज ऑफ मेडिसिनचे नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनचे जीन डॉ. पिटर होटेज यांनी एका वेबिनारदरम्यान व्यक्त केलं.
कोरोना प्रतिबंधात्मक लस विकसित करणं हे या विषाणू विरोधात लढण्यासाठी जगाला भारताकडून मिळालेलं गिफ्ट आहे, असं ते म्हणाले. डॉ. होटेज हे ‘कोविड-१९ : वॅक्सीनेशन अँड पोटेंशियल रिटर्न टू नॉर्मल्सी - इफ एंड व्हेन’या वेबिनारमध्ये बोलत होते. भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेककडून लसींची निर्मिती केली जात आहे. या दोन्ही लसींच्या वापरास अनेक देशांनी मंजुरी दिली आहे.