कोरोना लसीकरणासाठी नेलं अन् नसबंदी करुन आणलं, पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 04:52 PM2021-07-12T16:52:42+5:302021-07-12T16:53:00+5:30
अवागढ येथील पोलीस ठाण्यात पीडित युवकाच्या भावाने संबंधित आशा वर्करविरोधात तक्रार दिली आहे. अवागढ विभागाच्या बिशनपूर गावातील मुक-बधिर युवकाचा भाऊ अशोक कुमारने सांगितले
लखनौ - उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा लसीकरण करताना मोठी चूक झाल्याचे उघडकीस आले आहे. येथील एटा जिल्ह्यात एका मुक-बधिर तरुणाला आशा वर्करने कोरोना व्हॅक्सीन लस देण्याच्या कारणाने सरकारी रुग्णालयात नेले होते. मात्र, लस देण्याऐवजी त्या युवकाची नसबंदी करण्यात आली. त्यानंतर, बेशुद्ध अवस्थेतच त्या मुलाला आशा वर्करने घरी सोडले. दरम्यान, युवकाच्या कुटुंबीयांना त्यास रुग्णालयात नेले असून सध्या आग्रा येथे रेफर करण्यात आले आहे. यापूर्वीही कोरोना लसीच्याऐवजी रेबीजचे इंजेक्शन दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते.
अवागढ येथील पोलीस ठाण्यात पीडित युवकाच्या भावाने संबंधित आशा वर्करविरोधात तक्रार दिली आहे. अवागढ विभागाच्या बिशनपूर गावातील मुक-बधिर युवकाचा भाऊ अशोक कुमारने सांगितले की, आशा वर्कर आमच्या घरी आल्या होत्या, त्यांनी लसीकरण करण्यासाठी भावाला घेऊन जात असल्याचे सांगितले. तसेच, तुमच्या भावाच्या बँक खात्यात 3500 रुपये जमा होतील, त्यासाठी बँक पासबुक आणि आधार कार्ड द्या, असेही त्यांनी सांगितले होते. अशोकने सोबत येण्याबाबत विचारलं असता, एकट्या भावालाच बोलावले आहे, असेही त्या म्हणाल्या.
अशोकने परवानगी दिल्यानंतर त्याच्या भावाला घेऊन आशा वर्करने जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तेथे लस न देता त्याची नसबंदी केली. अशोकलाही भाऊ घरी आल्यानंतर ही बाब लक्षात आली. त्यानंतर, अशोकने संबंधित आशा वर्करकडे जाब विचारल असता, 20 हजार रुपये घेऊन प्रकरण मिटवण्याचं तिने म्हटल्याचं अशोकने सांगितलं. दरम्यान, याप्रकरणी लस देण्याच्या बहाण्याने नसबंदी करण्यात आल्याची घटना घडली असून याप्रकरणी तपास सुरू असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.