स्वदेशी लसींच्या बळावरच कोरोनाला हरविणार -मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 04:57 AM2021-01-17T04:57:01+5:302021-01-17T07:09:37+5:30
कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते म्हणाले की, कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे, तसेच लस घेतल्यानंतरही मास्क परिधान करणे व फिजिकल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन नागरिकांनी सुरूच ठेवायचे आहे.
नवी दिल्ली : भारतात बनविलेल्या लसींच्या साहाय्यानेच लसीकरण मोहीम राबविली जाणार असून, आपण कोरोना साथीवर नक्कीच विजय मिळवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले.
कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते म्हणाले की, कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे, तसेच लस घेतल्यानंतरही मास्क परिधान करणे व फिजिकल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन नागरिकांनी सुरूच ठेवायचे आहे. ‘दवाई भी, कड़ाई भी’ (औषधही व नियमांचे पालनही) ही घोषणा नागरिकांनी कायम ध्यानात ठेवायची आहे.मोदी यांनी सांगितले की, देशाने अगदी कमी वेळात एक नाही, तर दोन स्वदेशी कोरोना लस बनविल्या आहेत.
कोरोना लसी आहेत संजीवनी : आरोग्यमंत्री हर्षवर्धन -
कोरोना प्रतिबंधक लसी या संजीवनी औषध आहेत, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. कोरोना लसीकरण मोहिमेबद्दल पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. वैद्यकीय तज्ज्ञांची या मोहिमेबद्दलची मते प्रमाण माना. कोरोना लसीकरण मोहीम देशातील जनतेने यशस्वी करून दाखवावी, असे असे आवाहनही डॉ. हर्षवर्धन यांनी केले.
कोरोनाबळींच्या आठवणींनी मोदी भावुक -
- कोरोना साथीमध्ये नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागला. त्याचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले. ते म्हणाले की, या साथीमुळे अनेक जण मरण पावले, त्यांच्यावर एकाकी अवस्थेत अंत्यसंस्कार करावे लागले.
- अंतिम संस्कारांच्या वेळेस जे पारंपरिक विधी केले जातात तेही या काळात मृतांच्या नातेवाइकांना करता आले नाहीत. कोरोना साथीमुळे अनेक डॉक्टर, आरोग्यसेवक, तसेच कोरोना योद्धे मरण पावले. त्या सर्वांची आठवण काढताना मोदी यांचा कंठ दाटून आला होता.
साथ नष्ट होणे अशक्य -
कोरोना साथीचा जगात एकही रुग्ण उरला नाही अशी स्थिती निर्माण होणे अशक्य आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी म्हटले आहे.