कोरोनामुळे हळदीची निर्यात वाढणार; परदेशासह देशांतर्गतही मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 12:09 AM2020-09-09T00:09:20+5:302020-09-09T00:10:32+5:30
वापर वाढला
- अविनाश कोळी
सांगली : कोरोनाने अनेक क्षेत्रांना झटका दिला असताना, औषधी गुणधर्मामुळे हळदीला मागणी वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी होणारी सात लाख पोती निर्यात यंदा दहा लाखांवर जाण्याची शक्यता हळद व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. देशांतर्गत मागणीतही सुमारे १५ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.
सांगली, हिंगोली, बसमत, नांदेड, जळगाव येथून दरवर्षी हळदीचे उत्पादन घेतले जाते. आंध्र प्रदेशमधील हळदीलाही मागणी आहे. सध्या सांगली मार्केट यार्डात या सर्व ठिकाणांहून माल येत आहे. कोरोनामुळे यंदा मार्केट यार्डातील उलाढाल केवळ ४० ते ५० टक्केच होत असली तरी, अद्याप शेतकऱ्यांकडे माल पडून आहे.
जानेवारी ते जूनअखेर हळदीचा हंगाम असला तरी, त्यानंतरही बारमाही हळदीची उलाढाल सांगलीत सुरू असते. कोरोनाकाळात औषधी गुणधर्मामुळे अनेक औषधांमध्ये, काढ्यामध्ये त्याचा वापर सुरू झाल्याने मागणीत वाढ दिसत आहे.
परदेशातूनही मागणी होत आहे. ज्या देशांकडून हळदीची मागणी होत नव्हती, त्यांच्याकडूनही मागणी केली जात आहे. त्यामुळे दरवर्षी भारतातून होणारी ७ लाख पोती (५० किलोची) हळदीची निर्यात यंदा १० लाखांवर जाण्याची शक्यता हळद व्यापाºयांनी व्यक्त केली आहे. देशांतर्गत मागणीतही १५ टक्के वाढ होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी ९० ते ९५ लाख पोती हळदीचे देशांतर्गत उत्पादन होते.
देशांतर्गत व देशाबाहेर हळदीला मागणी वाढणार आहे. कोरोनामुळे औषधी असणाºया हळदीचा वापर वाढला आहे. त्याचा परिणाम निर्यात व देशांतर्गत उलाढालीवर होणार आहे. निर्यातीत मोठी वाढ होणार असल्याने चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.
- मनोहरलाल सारडा, चेंबर आॅफ कॉमर्स, सांगली