Corona Virus : ना टेस्टिंगची सुविधा, ना व्हॅक्सीन..., 14 लाख लोक तापानं फणफणले; उत्तर कोरियात कोरोनाचा हाहाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 03:03 PM2022-05-17T15:03:56+5:302022-05-17T15:04:43+5:30
नॉर्थ अँटी व्हायरस मुख्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या एक निवेदनानुसार, उत्तर कोरियात आतापर्यंत तापामुळे 56 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरसने आता उत्तर कोरियात थैमान घालायला सुरुवात केली आहे. येथे कोरोनाची पुष्टी झाल्यापासून तापाने फणफणनाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. येथे मंगळवारी 269,510 लोकांमध्ये तापाची लक्षणं दिसून आली आहेत. याशिवाय आणखी 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, उत्तर कोरियात फार कमी प्रमाणावर लसीकरण झाले आहे. यामुळे येथे कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचे मानले जात आहे.
नॉर्थ अँटी व्हायरस मुख्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या एक निवेदनानुसार, उत्तर कोरियात आतापर्यंत तापामुळे 56 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल 14.8 लाख लोक आजारी पडले आहेत. तर, तज्ज्ञांच्या मते, उत्तर कोरियातील बहुतांश लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. एवढेच नाही, तर गरिबी आणि कमकुवत आरोग्य व्यवस्था अशा अनेक कारणांमुळेही उत्तर कोरियात कोरोना टेस्टची, लसींची आणि उपचारांचीही पुरेशी व्यवस्था नाही.
कोरियात 6.6 लाख लोक क्वारंटाईन -
उत्तर कोरियात सध्या 663,910 लोक क्वारंटाईन आहेत. मात्र ताप आलेल्या किती रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, हे अद्याप उत्तर कोरियाने स्पष्ट केलेले नाही. एवढेच नाही, तर उत्तरकोरियामध्ये लोकांपर्यंत टेस्टिंग सुविधा पोहोचणेही कठीण झाले आहे. यामुळे संक्रमणाची माहिती मिळणेही कठीण झाले आहे. केवळ शेल्टरमध्ये राहणाऱ्या लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांनाच उपचार मिळू शकत आहे, असे बोलले जात आहे.