कोरोनाबाधित वृद्ध जोडप्याची कोटात रेल्वेखाली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 02:04 AM2021-05-04T02:04:06+5:302021-05-04T02:04:48+5:30
नातवाला आपल्यामुळे संसर्ग होऊ नये म्हणून उचलले पाऊल
कोटा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला असून, देशातील कोचिंग सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटा शहरातून धक्कादायक घटना समोर येत आहे. या शहरात कोरोनाची लागण झालेल्या वृद्ध जोडप्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आपल्यामुळे आपल्या नातवाला कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीतून या दाम्पत्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
या दाम्पत्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिले आहे. त्यानुसार, पोलीस उपअधीक्षक भगवत सिंह हिंगड यांनी सांगितले की, आत्महत्या रविवारी सायंकाळी घडली. येथील रेल्वे कॉलनी परिसरात राहणारे हीरालाल बैरवा (७५) आणि त्यांची पत्नी शांती बैरवा (७५) यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. त्यामुळे दोघेही तणावात होते. त्यांनी घरीच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपल्यामुळे आपला नातू रोहित याला कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती त्यांना वाटत होती. रविवारी कुटुंबीयांना काहीही न सांगता हे दाम्पत्य घरातून निघून गेले. त्यानंतर त्यांनी कोटाहून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर येणाऱ्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात, या दाम्पत्याच्या मुलाचे आठ वर्षांपूर्वी निधन झाल्याची माहिती मिळाली.
कोटामध्ये कोरोनाची स्थिती गंभीर
कोटा शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील पोलीस खात्यामधील ६०० हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी आतापर्यंत कोरोनाने बाधित झाले आहेत.