CoronaVaccine: स्वदेशी लस काेव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी; औषध नियंत्रकांकडे माहिती सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 06:23 AM2021-06-23T06:23:13+5:302021-06-23T06:23:25+5:30
काेव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यात २५८०० जणांवर चाचणी करण्यात आली हाेती.
नवी दिल्ली : भारत बायाेटेकने विकसित केलेली काेव्हॅक्सिन ही स्वदेशी काेराेना प्रतिबंधक लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर दिसून आले आहे. कंपनीने चाचणीचा अहवाल भारतीय औषध नियंत्रक महासंचालकांकडे लसीच्या मंजुरीसाठी सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काेव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यात २५८०० जणांवर चाचणी करण्यात आली हाेती. त्याचा अहवाल कंपनीने गेल्या आठवड्यात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या प्राथमिक तपासण्यांमध्ये दाेन डाेसनंतर लस ८१ टक्के प्रभावी दिसून आली हाेती. रुग्णालयात दाखल हाेण्याची शक्यता १००% घटल्याचे आढळून आले हाेते.
तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या अहवालानंतर लसीला मंजुरी मिळाल्यास जागतिक आराेग्य संघटनेकडूनही आपात्कालीन वापराच्या यादीत काेव्हॅक्सिनचा समावेश हाेऊ शकताे. अहवाल सादर करण्यापूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांची जागतिक आराेग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाेबत लवकरच बैठक हाेणार आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवासातील अडचण हाेईल दूर
जागतिक आराेग्य संघटनेच्या यादीत समावेश झाल्यानंतर लसीच्या निर्यातीस परवानगी मिळेल. तसेच लस घेतलेल्या भारतीयांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासातील अडचणीही दूर हाेतील. लसीला मान्यता नसल्यामुळे ही लस घेतलेल्या भारतीयांना अनेक देशांनी प्रवेश नाकारला हाेता. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा चाचणी अहवाल अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त पिअर रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित झालेला नाही. नियंत्रकांकडे अर्ज सादर केल्यानंतरच अहवाल प्रसिद्धीस देण्यात येईल, असे भारत बायोटेकने स्पष्ट केले आहे.