CoronaVaccine: रशियाची स्पुटनिक व्ही लस आज होणार भारतात दाखल; मे महिन्याअखेरीस मिळणार ५० लाख डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 05:41 AM2021-05-01T05:41:43+5:302021-05-01T05:45:02+5:30
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरूवात होत आहे.
नवी दिल्ली : देशात लसीकरण मोहिमेमध्ये रशियाने बनविलेल्या स्पुटनिक व्ही या लसीची भर पडणार असून तिचा साठा उद्या, १ मे रोजी भारतात येत आहे.
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरूवात होत आहे. सध्या या मोहिमेत कोविशिल्ड व कोवॅक्सिन या दोन लसी वापरल्या जात आहेत. त्यात आता स्पुटनिक व्ही या तिसऱ्या लसीची भर पडणार आहे. देशात कोरोना लसींची टंचाई निर्माण झाली आहे . या लसींचा पुरेसा पुरवठा १५ मेनंतर करण्यात येईल असे भारतातील लसउत्पादक कंपन्यांनी केंद्र व राज्य सरकारांना कळविले आहे. अशा स्थितीत रशियाची स्पुटनिक व्ही लस भारतात दाखल होत आहे ही दिलासादायक बाब आहे.
भारताचे रशियातील राजदूत बाला वेंकटेश वर्मा यांनी सांगितले की, उद्यापासून येत्या काही दिवसांत रशियातून स्पुटनिक व्ही लसीचे दीड ते दोन लाख डोस देशात येतील अशी अपेक्षा आहे. या लसीचे सुमारे ५० लाख डोस पुढच्या महिन्याच्या अखेरीपर्यंत भारताला मिळतील, असे सांगितले जाते.