CoronaVaccine: देशात एकाच दिवसात १.०९ कोटी लोकांचे लसीकरण; ५ दिवसांत दुसऱ्यांदा उच्चांक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 07:25 AM2021-09-01T07:25:16+5:302021-09-01T07:25:22+5:30
लसीकरण पोहोचले ६५ कोटींवर
नवी दिल्ली : कोविड-१९ विषाणूला रोखणाऱ्या लसीकरणाने देशात पाच दिवसांत दुसऱ्यांदा मंगळवारी एक कोटींचा टप्पा ओलांडला. यामुळे आतापर्यंत एकूण ६५ कोटी लोकांचे लसीकरण झाले, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ट्विटरवर म्हणाले की, “मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १.०९ कोटी लोकांना लस दिली गेली होती. ५० कोटी लोकांना लसीची पहिला मात्रा दिली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश समर्थपणे कोरोनाशी लढत आहे.”
भारताने १० कोटीचा टप्पा गाठण्यास ८५ दिवस घेतले. नंतरच्या ४५ दिवसांत २० कोटी आणि ३० कोटीची पायरी गाठण्यास २९ दिवस लागले. २४ दिवसांत ४० कोटीचा आणि आणखी २० दिवसांत ५० कोटींचा टप्पा ६ ऑगस्ट रोजी ओलांडला. आणखी १९ दिवसांनी म्हणजे २५ ऑगस्ट रोजी ६० कोटीचा पल्ला गाठला. देशात १६ जानेवारी, २०२१ रोजी लसीकरणास सुरुवात झाली. तेव्हा आराेग्य कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा लस दिली गेली. दोन फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू झाले.
लसीकरणाचा दुसरा टप्पा ६० वर्षांच्या वरील आणि सह आजार असलेल्या ४५ वयाच्या पुढच्या लोकांसाठी एक मार्चपासून सुरू झाला. एक एप्रिलपासून देशात ४५ वर्षे वयाच्या पुढील सर्वांसाठी लसीकरणाला सुरूवात झाली. त्यानंतर सरकारने एक मेपासून १८ वर्षांच्या पुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला.
२४ तासांत देशात कोरोनाचे ३५० मृत्यू
देशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ३०,९४१ रुग्ण आढळले, तर ३५० जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या आता ४,३८,५६० झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून ३,७०,६४० झाली आहे. एकूण बाधितांच्या संख्येत हे प्रमाण १.१३ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५३ टक्के आहे. देशव्यापी मोहिमेत मंगळवारी सकाळपर्यंत ६४.०५ कोटी लोकांना कोविड १९ विषाणूवरील लस दिली गेली, असेही निवेदनात म्हटले.