Coronavirus : जगातील १00 कोटी लोक सध्या घरांतच; अनेक देशांतील निर्बंधांचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 01:03 AM2020-03-24T01:03:35+5:302020-03-24T06:02:11+5:30
coronavirus : कोरोना विषाणूची लागण होण्याच्या भीतीने काही कोटी लोक स्वत:हूनच घरांमध्ये आहेत, तर काही देशांनी लोकांवर बंधने घातली आहेत. इटली, फ्रान्स, अर्जेंटिना या देशांत लोकांच्या घराबाहेर पडण्यावरच निर्बंध आहेत.
पॅरिस/नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, म्हणून विविध देशांनी आपल्या नागरिकांवर घातलेले निर्बंध आणि केलेली आवाहने यांमुळे आजच्या घडीला जगभरातील १00 कोटी लोक सध्या घरांतच आहेत. जगातील ५0हून अधिक देशांमधील लोकांची ही संख्या आहे.
कोरोना विषाणूची लागण होण्याच्या भीतीने काही कोटी लोक स्वत:हूनच घरांमध्ये आहेत, तर काही देशांनी लोकांवर बंधने घातली आहेत. इटली, फ्रान्स, अर्जेंटिना या देशांत लोकांच्या घराबाहेर पडण्यावरच निर्बंध आहेत. त्यांना सध्या घराबाहेर पडण्याची परवानगीच नाही. इराण व ब्रिटन या देशांनी आपल्या नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जगभरात १00 कोटी लोक घरांमध्येच आहेत, असे एफएपी या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. भारतातील काही राज्यांमध्येही जमावबंदीचा आदेश आहे, तर काही राज्यांत अन्य निर्बंध आहेत. जवळपास सर्व राज्यांतील सरकारी कार्यालयांत ५ ते १0 टक्के लोकच कामावर येत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवांतील लोकांनाच कामावर जाण्याची परवानगी आहे. खासगी कार्यालये, कंपन्या, आस्थापना पूर्णत: बंद करण्याचे आदेश आहेत.
४० कोटींहून अधिक
भारतीय सध्या घरांत
त्यामुळे सध्या घरांतच असलेल्यांची संख्या १00 कोटींहून कदाचित अधिकच असू शकेल, असा अंदाज आहे. भारताची लोकसंख्या सुमारे १३0 कोटी आहे. त्यातील एक तृतियांश टक्के लोक घरी असले तरी ती संख्या ४0 कोटींच्या आसपास जाते. प्रत्यक्षात त्याहून अधिक लोक आज घरांमध्ये आहेत. त्यामुळेच हा आकडा १00 कोटींहून अधिक असेल, असा अंदाज आहे.