Coronavirus: घाबरु नका, पण काळजी घ्या! इटलीतील ‘त्या’ ११ पर्यटकांना भारताने केलं कोरोनामुक्त; रुग्णालयातून डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 12:50 PM2020-03-24T12:50:54+5:302020-03-24T12:52:34+5:30
इटलीच्या काही कोरोना रुग्णांवर भारतात उपचार सुरु होते. त्यांना गुडगाव येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. पर्यटनासाठी हे लोक भारतात आले होते.
गुडगाव – जागतिक महामारी बनलेल्या कोरोना व्हायरसमुळे इटलीत हाहाकार माजला आहे. चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. आतापर्यंत इटलीत ६ हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर जगभरात कोरोनामुळे १६ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या ५०० च्या वर पोहचली आहे.
इटलीच्या काही कोरोना रुग्णांवर भारतात उपचार सुरु होते. त्यांना गुडगाव येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. पर्यटनासाठी हे लोक भारतात आले होते. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आल्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. उपचारानंतर या लोकांची तब्येत पूर्णत: बरी झाली असून त्या ११ जणांना सोमवारी मेदांता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलं त्यानंतर या पर्यटकांना इटलीच्या दूतावासांकडे सोपवण्यात आलं आहे.
२१ लोकांच्या ग्रुपमधून १६ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
इटलीचे २१ पर्यटक भारत दौऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. यापैकी २१ पैकी १६ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. यातील १४ जणांवर गुडगावच्या मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच्यांसोबत असलेल्या भारतीय ड्रायव्हरचा देखील १६ जणांमध्ये समावेश होता. त्यानंतर त्याला आयटीबीपीच्या छावणीत दाखल करण्यात आले.
तीन राज्यात भटकंती
पर्यटकांचा या ग्रुपने तीन राज्यात भटकंती केली होती. राजस्थाननंतर हे लोक दिल्लीत पोहचले. त्यावेळी त्यांची चाचणी केली असता कोरोना पोझिटिव्ह आढळले. यापूर्वी ते आग्रा येथेही गेले होते. गुडगावमध्ये या ११ पर्यटकांव्यतिरिक्त आणखी ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं. सध्या गुडगावमध्येही कोणताही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही.
या देशांत आहेत एक अथवा केवळ दोन रुग्ण
ज्या देशात इतर देशांतून येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. अशा देशांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. मात्र, असेही काही देश आहेत, की जेथे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या एक अथवा दोन एवढीच आहे. यात फिजी, गांबिया, निकारगुआ आणि कांगोसह भारता जवळील नेपाळ आणि भूतानचा समावेश होतो. नेपाळ आणि भूतानमध्ये अद्याप केवळ एकच रुग्ण आढळला आहे.
या देशांत अद्याप पोहोचू शकला नाही 'कोरोना'
जगातील जे देश अद्याप या महामारीपासून बचावलेले आहेत, त्यांपैकी अधिकांश देश अत्यंत छोटे आणि वैश्विक दृष्ट्या एकाकी आहेत. यापैकी तर अनेक देशांची नावे अशी आहेत, जी तुम्ही क्वचितच ऐकली असतील. या देशांत पलाऊ, तुवालू, वानुआतू, तिमोर-लेस्टे, सोलोमन आयलँड, सिएरा लियोनी, सामोआ, सैंट विंसेट अँड ग्रेनाडिनीज, सैंट किटिस अँड नेविससारख्या देशांचा समावेश होतो. या देशांत अद्याप कोरोना पोहोचू शकलेला नाही.
इटलीत एका दिवसांत ८०० लोकांचा मृत्यू
जगभरात ३ लाख ७८ हजारांहून अधिक लोक कोरोनाबाधित झाले आहेत. तर तब्बल १६ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित देशांमध्ये चीननंतरइटलीला सर्वाधिक फटका बसला असून, कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत इटली आता चीनच्या पुढे गेला आहे. इटलीत एका दिवसांत ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे.