Coronavirus : इटलीचे ११ पर्यटक झाले कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 01:41 AM2020-03-25T01:41:52+5:302020-03-25T01:42:36+5:30
Coronavirus : इटलीहून २१ जण पर्यटनासाठी आले होते. त्यांच्यातील १६ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले.. त्यापैकी १४ जणांना मेदान्ता रुग्णालयात दाखल केले. त्यांच्याबरोबर असलेल्या भारतीय ड्रायव्हरलाही संसर्ग झाला होता. त्याला आयटीबीपीच्या विलगीकरण शिबिरात ठेवले होते.
गुरगाव : इटलीमध्ये कोरोनाने हाहाकार माजला असून, आतापर्यंत तिथे पाच हजारांवर लोक मरण पावले असले तरी त्या देशांतून भारतात आलेले आणि कोरोनाची लागण झालेले ११ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना सोमवारी संध्याकाळी येथील मेदान्ता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना इटलीच्या भारतातील दुतावासाकडे सोपविण्यात आले आहे.
इटलीहून २१ जण पर्यटनासाठी आले होते. त्यांच्यातील १६ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले.. त्यापैकी १४ जणांना मेदान्ता रुग्णालयात दाखल केले. त्यांच्याबरोबर असलेल्या भारतीय ड्रायव्हरलाही संसर्ग झाला होता. त्याला आयटीबीपीच्या विलगीकरण शिबिरात ठेवले होते. मेदान्तामधील १४ पैकी ११ जण बरे झाले आहेत.
हे पर्यटक देशातील तीन राज्यांमध्ये फिरायला गेले होते. त्यानंतर राजस्थानमार्गे ते दिल्लीत आले. तिथे त्यांची तपासणी करण्यात आली असताना १४ जणांना व ड्रायव्हरला लागण झाल्याचे आढळून आहे. याशिवाय गुरगावमध्ये आणखी ८ जणांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता.
दिल्लीत रुग्ण नाही
दिल्लीत गेल्या ४0 तासांत कोरोनाची कोणालाही लागण झालेली नाही.ही दिलासा देणारी बाब आहे, असे सांगून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, ज्या ५ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले होते, त्यांना घरी पाठवले आहे. पण आणखी काही काळ कोरोनाचा सामना करावा लागणार आहे.