CoronaVirus: आशियाई विकास बँकेकडून दीड अब्ज डॉलरचे कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 06:15 AM2020-04-29T06:15:16+5:302020-04-29T06:15:29+5:30
साथीला प्रतिबंध करणे व आळा घालणे तसेच गरीब व दुर्बल समाजवर्गांना मदत करणे यासारख्या अग्रक्रमाच्या कामांसाठी हे कर्ज प्रामुख्याने असेल.
नवी दिल्ली : कोरोना महामारीविरुद्धच्या लढ्याला आर्थिक बळकटी देण्यासाठी आशियाई विकास बँकेने मंगळवारी भारताला १.५ अब्ज डॉलरचे (सुमारे ११,३७५ कोटी रुपये) कर्ज मंजूर केले. साथीला प्रतिबंध करणे व आळा घालणे तसेच गरीब व दुर्बल समाजवर्गांना मदत करणे यासारख्या अग्रक्रमाच्या कामांसाठी हे कर्ज प्रामुख्याने असेल.
कर्जाच्या अटींनुसार कोरोनाविरुद्धच्या युद्धात आघाडीवर राहून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याचाही यात समावेश आहे. कर्जाची सुमारे ६५ टक्के रक्कम गरीब व महिलांसह समाजातील दुर्बल घटकांना सामाजिक सुरक्षा व थेट आर्थिक मदत देण्यासाठी असेल.
बँकेने गरजू देशांना मदत करण्यासाठी ‘कोविड-१९ अॅक्टिव रिस्पॉन्स अॅण्ड एक्स्पेंडिचर प्रोग्राम’ (केअर्स) नावाचा विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे कर्ज देण्यात येत असून त्यातून संबंधित देशातील आरोग्यसेवा सुधारणे व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, शेतकरी, आरोग्य कर्मचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अल्प उत्पन्नधारी व्यक्ती व बांधकाम कामगार अशा आठ कोटींहून अधिक लोकांना सामाजिक सुरक्षा दिली जाईल. कोरोनाला आळा घालण्यासाठी भारताने योजलेल्या उपायांचे कौतुक करून बँकेचे अध्यक्ष मसात्सुगा असाकावा यांनी म्हटले की, भारताच्या प्रयत्नांना पूर्णपणे मदत करण्यास बँक कटिबद्ध आहे.
>जागतिक बँकेचीही मदत
याआधी जागतिक बँकेने २५ विकसनशील देशांमधील कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी १.७ अब्ज डॉलरचा विशेष निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते. यापैकी सुमारे निम्मा निधी भारताला मिळणार आहे. पुढील १५ महिन्यांत विकसनशील देशांना १६० अब्ज डॉलर कोरोनासाठी उपलब्ध करून देण्याची योजनाही बँकेने जाहीर केली आहे.