Coronavirus: इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाची बाधा; एम्सकडून दुजोरा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 11:19 AM2020-03-04T11:19:55+5:302020-03-04T11:55:32+5:30
देशात आतापर्यंत २१ जणांना कोरोनाची बाधा
नवी दिल्ली: पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीमध्ये अनेकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे इटलीहून आलेल्या पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चाचणी करण्यात आलेल्या २१ पैकी १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. सर्व पर्यटकांना हरयाणातल्या छावलामधील आयटीबीपीच्या छावणीत ठेवण्यात आलं आहे.
नोएडातल्या तीन मुलांसह सहा जणांचे नमुनेदेखील चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचं चाचणी अहवालातून समोर आलं. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या सहा जणांना पुढील १४ दिवस त्यांच्या घरात कुटुंबीयांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं दिसल्यास त्यांच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
15 out of 21 Italian tourists test positive for #coronavirus: Sources pic.twitter.com/J4Ki8gVlcz
— DD News (@DDNewslive) March 4, 2020
कालपर्यंत देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या ६ होती. त्यात आता इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांची भर पडल्यानं हा आकडा २१ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ६ भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाला. यातले तीन जण केरळचे होते. या सर्व रुग्णांवर उपचार पूर्ण झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाची पावलं उचलली आहेत. तीन मार्च किंवा त्याआधी व्हिसा जारी करण्यात आलेल्या इटली, इरान, दक्षिण कोरिया आणि जपानच्या नागरिकांना भारतात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजदूत, संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, ओसीआय कार्डधारक यांना मात्र यामधून वगळण्यात आलं आहे. मात्र त्यांना वैद्यकीय चाचण्यांनंतर देशात प्रवेश दिला जाईल.