coronavirus: क्वारंटाइनला नकार देणाऱ्या १९ प्रवाशांना कर्नाटकमधून परत पाठविले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 05:25 AM2020-05-16T05:25:22+5:302020-05-16T05:26:05+5:30
दिल्लीहून सुपरफास्ट एसी विशेष गाडीने ५४३ प्रवासी बंगळुरूला आले. त्यातील सुमारे दीडशे प्रवाशांनी आम्ही क्वारंटाइनमध्ये राहणार नाही, अशी भूमिका घेतली होती
बंगळुरू : दिल्लीहून बंगळुरूला गुरुवारी सकाळी सुपरफास्ट एसी विशेष रेल्वेगाडीने आलेल्या लोकांपैकी १९ जणांनी चौदा दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये राहण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच रात्री या गाडीला एक विशेष एसी डबा जोडून त्यांना पुन्हा दिल्लीला पाठवून देण्यात आले. दिल्लीच्या दिशेने पुन्हा पाठविलेल्या या १९ प्रवाशांपैकी १२ जण सिकंदराबाद, दोन जण गुंटक्कल, चार जण अनंतपूर व एक जण नवी दिल्लीपर्यंत प्रवास करणार आहे असे दक्षिण रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
दिल्लीहून सुपरफास्ट एसी विशेष गाडीने ५४३ प्रवासी बंगळुरूला आले. त्यातील सुमारे दीडशे प्रवाशांनी आम्ही क्वारंटाइनमध्ये राहणार नाही, अशी भूमिका घेतली होती व रेल्वे स्थानकातच निदर्शने सुरू केली. त्यातील १९ जण वगळता अन्य लोकांचे मन वळविण्यात दक्षिण रेल्वेच्या अधिकारी व रेल्वे पोलिसांना यश आले. आम्हाला होम क्वारंटाइन होण्याची परवानगी द्या, अशीही मागणी या प्रवाशांनी केली होती. बंगळुरूत क्वारंटाइनमध्ये राहण्यास नकार देणाऱ्या १९ प्रवाशांनी ते जिथून आले होते तिथे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली.