CoronaVirus : देशातील उपचाराधीन रुग्णसंख्या २ लाखांवर, २६ हजार नवे रुग्ण; मृत्युदरात आणखी घट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 05:03 AM2021-03-16T05:03:20+5:302021-03-16T05:04:08+5:30
कोरोनाचे २६ हजारांहून अधिक नवे रुग्ण सोमवारी आढळून आले. गेल्या ८५ दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. २० डिसेंबर रोजी कोरोनाचे २६,६२४ नवे रुग्ण सापडले होते. देशात कोरोनाचे १ कोटी १३ लाख रुग्ण असून, त्यातील १ कोटी १० लाख रुग्ण बरे झाले.
नवी दिल्ली : देशात कोरोना साथीचा विळखा आणखी घट्ट होत असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २ लाखांवर पोहोचली आहे. १२ फेब्रुवारी रोजी उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाख ३० हजार होती. पण, अवघ्या महिनाभराच्या कालावधीत त्यामध्ये सुमारे ९० हजार रुग्णांची भर पडली आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या मृत्युदरात आणखी घट होऊन तो १.३९ टक्के झाला.
कोरोनाचे २६ हजारांहून अधिक नवे रुग्ण सोमवारी आढळून आले. गेल्या ८५ दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. २० डिसेंबर रोजी कोरोनाचे २६,६२४ नवे रुग्ण सापडले होते. देशात कोरोनाचे १ कोटी १३ लाख रुग्ण असून, त्यातील १ कोटी १० लाख रुग्ण बरे झाले.
सोमवारी या संसर्गामुळे आणखी ११८ जण मरण पावले व एकूण बळींचा आकडा १ लाख ५८ हजारांवर पोहोचला आहे. गेल्या पाच दिवसांत उपचाराधीन रुग्णांची संख्या सतत वाढत असून त्यांचे प्रमाण आता १.९३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९६.६८ टक्के झाले. बळी गेलेल्यांमध्ये ७० टक्क्यांहून जास्त लोक एकापेक्षा अधिक व्याधींनी आजारी होते.
अमेरिकेत ३ कोटी कोरोना रुग्ण
अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटींवर पोहोचली आहे. तिथे २ कोटी २२ लाख जण बरे झाले असून ७३ लाख लोकांवर उपचार सुरू आहेत. या देशात बळींचा आकडा साडेपाच लाखांच्या घरात पोहोचला आहे. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १२ कोटी ४ लाख झाली असून, त्यातील ९ कोटी ६९ लाख लोक बरे झाले तर २ कोटी ७ लाख लोकांवर उपचार सुरू आहेत. जगात या संसर्गाने २६ लाख ६५ हजार लोकांचा बळी गेला आहे.
महाराष्ट्रातून येणाऱ्यांना आठवडाभर क्वारंटाईन
महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना एक आठवडा क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. मध्य प्रदेशने छिंदवाडा, बालाघाट, बैतूल, सिओनी, खांडवा, बारवानी, खरगोन, बुऱ्हाणपूर या आठ सीमावर्ती जिल्ह्यांच्या प्रशासनाला तसे आदेश जारी केले आहेत.
मनोरुग्णांनाही लस; केंद्राचे उत्तर मागविले
मनोरुग्णांनाही प्राधान्याने लस द्यावी, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागविले आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ३० एप्रिल रोजी होणार आहे.
मनोरुग्ण, बेघर व्यक्तींना लस देण्यासाठी न्यायालयाने आदेश द्यावा, असे या जनहित याचिकेत म्हटले होते.
मास्क घालावा, नियम पाळावेत : राहुल गांधी
नागरिकांनी मास्क घालावेत व सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून संरक्षण करावे असे आवाहन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले आहे. गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असल्याचा आलेखही राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटसोबत जोडला आहे.