Coronavirus: संपूर्ण देशात २१ दिवस लॉकडाऊन; पंतप्रधान नरेंद्र मोदी कसं करतायेत ‘वर्क फ्रॉम होम’? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 08:41 AM2020-03-25T08:41:52+5:302020-03-25T08:44:40+5:30
कोरोनातून बरे झालेले आणि रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांच्या आकडेवारीवर पंतप्रधानांची करडी नजर असते.
नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात पुढील २१ दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी केली. पंतप्रधानांपासून ते गावातील खेड्यातील व्यक्तीपर्यंत सर्वांनीच विनाकारण घराच्या बाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असं त्यांनी सांगितले. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखावी असं नरेंद्र मोदी म्हणाले.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून वर्क फ्रॉम होम करत आहेत. ७, लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानातून त्यांचे काम सुरु आहे. मोदी पंतप्रधान कार्यालयात जात नाहीत. घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठका घेतात. कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. पंतप्रधानांनी देशाला संबोधित करणारी दोन्ही भाषणं ही त्यांच्या निवासस्थानातूनच झाली.
मुख्य सचिव पी. के मिश्रा, कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा, आरोग्य सचिव प्रिती सूदन आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांच्यासारखे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी घरात बैठक घेतात. दिवसभराचा आढावा या बैठकीत घेण्यात येतो.
प्रत्येक आकडेवारीवर करडी नजर
कोरोनातून बरे झालेले आणि रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांच्या आकडेवारीवर पंतप्रधानांची करडी नजर असते. मंगळवारी सकाळपर्यंत असे ३७ रुग्ण आढळले. इकोनॉमिक्स टाइम्सशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीची माहिती दिली जाते. कारण भारताकडे कोरोना व्हायरसच्या रुग्णांना बरे करण्याची क्षमता आहे असा विश्वास लोकांमध्ये राहावा. त्याचसोबत या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अधिकारी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करतात. अनेक राज्यांमध्ये केलेली प्रवेशबंदीमुळे जास्तीत जास्त लोकांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करतात.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान कॉर्पोरेट प्रतिनिधी, फार्मा उद्योगाचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया आणि डॉक्टर आणि वैद्यकीय संघटना यांच्याशी बैठक घेतात. येत्या काही दिवसांत अशा प्रकारच्या आणखी बैठका होणार आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पीएम मोदी स्वत: मिळालेल्या माहितीकडे लक्ष देत आहेत. पंतप्रधान बुधवारी त्यांच्या वाराणसी मतदारसंघतील लोकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील.