Coronavirus: पाच राज्ये २१ रुग्ण, लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग, भारतात वेगाने वाढतोय ओमायक्रॉनचा फैलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 08:40 AM2021-12-06T08:40:16+5:302021-12-06T08:40:59+5:30
Coronavirus: जगभरातील ३८ देशामध्ये पसरलेला कोरोनाचा Omicron Variant आता भारतातही वेगाने फैलावत आहे. केवळ चार दिवसांमध्ये देशातील ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे.
नवी दिल्ली - जगभरातील ३८ देशामध्ये पसरलेला कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आता भारतातही वेगाने फैलावत आहे. केवळ चार दिवसांमध्ये देशातील ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे. २ डिसेंबर रोजी देशात ओमायक्रॉनची बाधा झालेला पहिला रुग्ण सापडला होता. तेव्हापासून ६ डिसेंबरपर्यंत या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ पर्यंत पोहोचली आहे.
रविवारी एका दिवसामध्ये ओमायक्रॉनचे १७ नवे रुग्ण सापडले आहेत. राजस्थानमधील जयपूरमध्ये ९, महाराष्ट्रामध्ये ७ आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचा एक रुग्ण सापडला. आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंट राजधानी दिल्लीसह पाच राज्यांमध्ये पसरला आहे. सर्वाधिक ९ रुग्ण राजस्थानमध्ये, महाराष्ट्रामध्ये ८, कर्नाटकमध्ये २ तर दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.
आतापर्यंत ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले जे रुग्ण सापडले आहेत. ते हल्लीच दक्षिण आफ्रिकेचा दौरा करून आलेले होते किंवा हाय रिस्क देशांमधून प्रवास करून आलेल्या लोकांच्या संपर्कात होते. आता ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू शकते. कारण अनेक संशयित रुग्णांचा रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचे ट्रेसिंगही करण्यात आले आहे.
मात्र दिलासादायक बाब म्हणजे ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे बाधित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. तसेच आतापर्यंत कुठल्याही रुग्णामध्ये गंभीर लक्षणे दिसलेली नाहीत. दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितले की, राजधानीमध्ये जो रुग्ण सापडला आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत अत्यंत सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. तसेच महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवडमध्येही जे ६ रुग्ण सापडले आहेत त्यांच्यामधील एका महिलेमध्ये सौम्य लक्षणे दिसली आहेत. उर्वरित पाच रुग्णांमध्ये कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. कर्नाटकमध्येही जे दोन रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यामध्येही काही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. मात्र थकवा, कमकुवतपणा आणि ताप अशी लक्षणे दिसून येत आहेत.
ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे दिसत आहेत. मात्र हेच त्रासाचे कारण ठरू शकते. कारण सौम्य लक्षणे किंवा लक्षणे दिसत नसल्याने कोरोनाचा संसर्ग झाला आहे याची जाणीव रुग्णांना होत नाही आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे.