Coronavirus: कोरोना संकटकाळात २३० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; खळबळजनक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 10:35 PM2020-04-09T22:35:33+5:302020-04-09T22:40:08+5:30
खोऱ्यात दहशतवादी कारवाया करण्याच्या उद्देशाने हे दहशतवादी गट कार्यरत आहेत.
नवी दिल्ली – एकीकडे देशात कोरोना व्हायरसचं संकट उभं राहिलं असताना दुसरीकडे काश्मीर खोऱ्यात भारतीय सीमेत तब्बल २३० दहशतवादी घुसण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे. पाकव्याप्त काश्मीरात गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी तळ ठोकला आहे. पुढील काही काळात अथवा महिन्यात हे दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याच्या तयारीत आहेत.
रविवारीच भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैन्याला यश आलं. ते दहशतवादी सीमेतून भारतात प्रवेश करत होते. जम्मू काश्मीरचे पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, सीमेजवळ अनेक दहशतवादी समूह तळ ठोकून आहेत. काश्मीर खोऱ्यात शांतता भंग करण्यासाठी हे दहशतवादी भारतीय सीमेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.
खोऱ्यात दहशतवादी कारवाया करण्याच्या उद्देशाने हे दहशतवादी गट कार्यरत आहेत. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार लष्कर ए तोएबा, जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटनांशी जोडलेले १६० दहशतवादी काश्मीर खोऱ्यात प्रवेश करण्यास सज्ज आहेत. त्याचसोबत जम्मू परिसरातील ७० सशस्त्र आणि प्रशिक्षित दहशतवादी नदी आणि नाल्याच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करण्यासाठी लॉन्च पॅड तयार करुन आहेत.
माहितीनुसार जैश ए मोहम्मदचे दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरच्या समानी-भीम्बर आणि दुधनील येथे लॉन्च पॅडवर तळ ठोकून आहेत. जम्मू काश्मीरमध्ये संधी मिळताच हे दहशतवादी भारताच्या सीमेत घुसण्याच्या तयारीत आहेत. यासह लष्कर ए तोएबाचे दहशतवादी लीपा खोरे, नीलम घाटी परिसरात लॉन्च पॅड बनवून तयार आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरुन १३३ दहशतवाद्यांची घुसखोरी झाली. यातील बहुतांश घुसखोरी एप्रिल आणि सप्टेंबर महिन्याच्या काळात झाली. जानेवारी-फेब्रुवारी २०२० मध्ये भारतीय सुरक्षा रक्षकांनी ४८ जिहादींसह तीन परदेशी नागरिक आणि २४ दहशतवादी यांना पकडण्यात यशस्वी झालेत. ५ एप्रिल रोजी चकमकीत ५ दहशतवादी मारले गेले. त्यावरुन अंदाज येतो की, लष्कर ए तोयबा कुपवाडा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्यासाठी मोठा डाव आखतंय. पाकिस्तानमधून घुसखोरी विविध क्षेत्रातून होते. यात काश्मीर क्षेत्रात गुरेज, माचिल, केरन, तंगधार, नौगाम आणि उरी प्रमुख आहे. राजोरी सेक्टरमध्ये पुंछ, कृष्णाघाटी, भीम्बर गली, सुंदरबनी आणि नौशेरा आहे. तर जम्मू सेक्टरमधून जैरियन, हिरा नगर, कठुआ, सांबा आणि जम्मू आहे असं गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.