coronavirus : कंटाळा आला म्हणून पत्ते खेळायला गेले, 24 जण कोरोना पॉझिटिव्ह झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 11:25 AM2020-04-28T11:25:39+5:302020-04-28T11:39:06+5:30
लॉकडाऊनमुळे सतत घरात राहून अनेकजण कंटाळले आहेत. हा कंटाळा घालवण्यासाठी लोकांकडून लॉकडाऊनमधून पळवाटा काढल्या जात आहेत. मात्र अशा पळवाटा अनेकांना कोरोनाबाधित करत आहेत.
विजयवाडा (आंध्र प्रदेश) - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन सुरू आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे सतत घरात राहून अनेकजण कंटाळले आहेत. हा कंटाळा घालवण्यासाठी लोकांकडून लॉकडाऊनमधून पळवाटा काढल्या जात आहेत. मात्र अशा पळवाटा अनेकांना कोरोनाबाधित करत आहेत. असाच एक प्रकार समोर आला आहे.
आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे लॉकडाऊनमुळे कंटाळलेल्या काही मित्र आणि शेजाऱ्यांनी विरंगुळ्यासाठी पत्त्यांचा डाव मांडला. मात्र हा डाव या या सर्वांना चांगलाच महागात पडला. पत्ते खेळणाऱ्यांपैकी 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील माहिती कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद इम्तियाज यांनी दिली. त्यांनी सांगितले की, 'विजयवाडामध्ये गेल्या काही दिवसांत एकूण 40 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील कृष्ण लंका परिसरात ट्रकचालक मित्र आणि शेजाऱ्यांसोबत मिळून पत्ते खेळत होता. तर महिला घोळका करून तंबोला खेळत होत्या. यावेळी फिजिकल डिस्टंसिंग बाळगली न गेल्याने 24 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर कर्मिकानगर येथे एका ट्रकचालकाने फिजिकल डिस्टंसिंगचे पालन न केल्याने 15 जणांना कोरोनाची बाधा झाली.
दरम्यान, विजयवाडा येथे आतापर्यंत कोरोनाचे सुमारे 100 रुग्ण सापडले आहेत. सोशल डिस्टंसिंगचे योग्य प्रकारे पालन न होणे हे कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागचे कारण असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.