CoronaVirus : धक्कादायक! न्यूज चॅनलचे २५ कर्मचारी कोरोना 'पॉझिटिव्ह', लाईव्ह शो रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 03:38 PM2020-04-21T15:38:06+5:302020-04-21T15:45:08+5:30
CoronaVirus: २५ कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
चेन्नई : भारतात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल 18 हजारांवर गेला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच आता चेन्नईमधील एका न्यूज चॅनलच्या २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
येथील राज्य सरकारच्या माहितीनुसार, तमीळ न्यूज चॅनलमध्ये कार्यरत असणाऱ्या २५ लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये पत्रकार, कॅमेरापर्सन आणि इतर लोकांचा समावेश आहे. दरम्यान, या तमीळ न्यूज चॅनलच्या जवळपास ९४ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामुळे न्यूज चॅनलला आपला लाईव्ह कार्यक्रम सुद्धा रद्द करावा लागला. तसेच, २५ कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, आधीच मुंबईतील तब्बल ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात पत्रकारांची संघटना टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने मुंबईतील १६७ जणांची कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचे रविवारी रिपोर्ट आले. यामध्ये १६७ जणांपैकी ५३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यामधील सर्वाधिक पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियामधील आहेत.
देशामध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता तब्बल 18 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. आरोग्य विभागाने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनामुळे ४७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १ हजार ३३६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १८ हजार ६०१ वर पोहचली आहे. तर ५९० जणांचा मृत्यू झाला आहे. १४ हजार ७५९ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ३२५२ लोकांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.