CoronaVirus News: एकाच घरातील तब्बल २६ जणांना कोरोनाची लागण; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 15:28 IST2020-06-09T15:27:13+5:302020-06-09T15:28:51+5:30
जयपूरमधील कोरोना बाधितांचा आकडा अडीच हजारच्या जवळ

CoronaVirus News: एकाच घरातील तब्बल २६ जणांना कोरोनाची लागण; परिसरात खळबळ
जयपूर: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या पावणे तीन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. अनेक राज्यांमधील कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. राजस्थानात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेगानं फैलाव होत आहे. त्यातच आता राजधानी जयपूरमधील एकाच घरात कोरोनाचे तब्बल २६ रुग्ण आढळल्यानं खळबळ माजली आहे.
जयपूरच्या सुभाष चौक परिसरात आज सकाळी एकाच कुटुंबातील २६ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली. जयपूरमध्ये पहिल्यांदाच एकाच घरात कोरोनाचे इतके रुग्ण आढळून आले आहेत. या घरातील एका व्यक्तीला कोरोना झाल्याचं दोनच दिवसांपूर्वी निष्पन्न झालं होतं. राजधानी जयपूरमधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढत आहे. जयपूरमधील रुग्णांची संख्या २ हजार ३२१ वर पोहोचली आहे.
राजस्थानमधील प्रमुख शहरांमध्ये आधीपासूनच कोरोनाचे रुग्ण आढळून येते. आता यामध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. त्यातच आतापर्यंत रुग्ण न सापडलेल्या भागांतही कोरोना विषाणूनं शिरकाव केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. राजस्थानातील कोरोना रुग्णांची संख्या ११ हजारांच्या पुढे गेली आहे. जयपूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यानंतर जोधपूर (१८८७), भरतपूर (७६२), पाली (६०२), उदयपूर (५८७), कोटा (५३०), नागोरचा (५०३) क्रमांक लागतो. राज्यात आतापर्यंत ८ हजाराहून अधिक जण बरे झाले असून २५१ जणांचा मृत्यू झाला आहे.
Unlock 1: मुंबईकरांनो, दुकानं, ऑफिस, शाळा, कॉलेजसाठीची नवी नियमावली जाणून घ्या
मुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 'त्या' भागांमधील एक तृतीयांश नागरिकांना कोरोना?