Coronavirus: सात दिवसांत आढळले २,६०,७४२ नवे रुग्ण; आठवड्याभरात ८४ हजार सक्रिय रुग्णांत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 03:16 AM2021-03-23T03:16:43+5:302021-03-23T03:17:01+5:30
गेल्या चोवीस तासांमध्ये देशातील २१ हजार १८० रुग्ण बरे झाले असून, २१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येतही महाऱाष्ट्राची संख्या अधिक आहे. देशातील २१२ कोरोनाबळींमध्ये ९९ रुग्ण हे एकटे महाराष्ट्रातील आहे.
नवी दिल्ली : कोरोनाचा कहर जगभरात वाढत असताना, लॉकडाऊन सुरू करण्याआधी देशभरात पाळण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला एक वर्ष पूर्ण झाले असले, तरी कोरोनाचा कहर अद्याप कमी झालेला नाही. गेल्या चोवीस तासांमध्ये भारतात ४६ हजार ९५१ नवे रुग्ण आढळले असून, त्यातील महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशातील नव्या रुग्णांचे प्रमाण ८४.४९ टक्के आहे.
सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढले असून, सध्या देशात ३,३४,६४६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे प्रमाण सध्या २.८७ टक्क्यांवर आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशातील २१ हजार १८० रुग्ण बरे झाले असून, २१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येतही महाऱाष्ट्राची संख्या अधिक आहे. देशातील २१२ कोरोनाबळींमध्ये ९९ रुग्ण हे एकटे महाराष्ट्रातील आहे.
राज्यात २४ हजारांहून अधिक नवे रुग्ण
राज्यात मागील काही दिवसांत सातत्याने दैनंदिन रुग्ण निदानांत उच्चांक गाठला जात होता. सोमवारी यात किंचित घट होऊन दिवसभरात २४ हजार ६४५ रुग्ण निदान झाले असून, ५८ मृत्यूंची नोंद झाली आहे; मात्र चिंतेची बाब म्हणजे, राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला असून, सध्या २ लाख १५ हजार २४१ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २५ लाख ४ हजार ३२७ झाली असून, बळींचा आकडा ५३,४५७ झाला आहे. दिवसभरात १९,४६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २२ लाख ३४,३३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात १५ मार्च रोजी सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ३० हजार ५४७ इतकी होती, हे प्रमाण आठवडाभरात वेगाने वाढून २२ मार्च, सोमवारी ही संख्या २ लाख १५ हजार २४१ झाली. मागील आठवड्याभरात राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत ८४ हजार ६९४ ने वाढ झाली आहे. ११ मार्च रोजी राज्यात १ लाख ६ हजार ७० रुग्ण उपचाराधीन होते.