CoronaVirus: ...म्हणून ३० एप्रिल आणि १५ मे अधिक काळजीच्या तारखा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 06:34 AM2020-04-20T06:34:53+5:302020-04-20T07:12:56+5:30

सतर्क राहण्याच्या केंद्राच्या सूचना; कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते

coronavirus 30th april and 15th may will be crucial dates amid covid 19 crisis | CoronaVirus: ...म्हणून ३० एप्रिल आणि १५ मे अधिक काळजीच्या तारखा!

CoronaVirus: ...म्हणून ३० एप्रिल आणि १५ मे अधिक काळजीच्या तारखा!

Next

- अतुल कुलकर्णी

मुंबई : ३० एप्रिल आणि १५ मे या दोन तारखा अधिक काळजीच्या असल्याचे केंद्र सरकारने कळविले असून या दोन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते अथवा कमीदेखील होऊ शकते. त्यामुळे अधिक सतर्क राहा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. कोरोनाचे रुग्ण ज्या तारखांना आढळत गेले त्यानुसार केंद्रीय आरोग्य विभागाने त्याची एक सायकल तयार केली असून त्यानुसार या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा संवाद साधला. ज्या ठिकाणी १५ पेक्षा जास्त रुग्ण आहेत व ज्या ठिकाणची संख्या वाढत आहे ते भाग रेड झोन, तर ज्या ठिकाणी १५ पेक्षा कमी रुग्ण आहेत व त्यांची संख्या वाढलेली नाही ते भाग ऑरेंज झोनमध्ये आणि जेथे गेल्या २८ दिवसात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही व आहे ते रुग्णही पूर्णपणे बरे झाले आहेत, तो भाग ग्रीन झोन म्हणून जाहीर करा, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. रुग्णांची आकडेवारी विभागवार सतत बदलत आहे त्यामुळे कोणत्या विभागाला कोणत्या झोनमध्ये ठेवायचे हे अधिकार त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना व विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत.

एखादा जिल्हा रुग्ण नाहीत म्हणून ग्रीन झोन केला आणि त्यात अचानक रुग्ण वाढू लागले तर त्या जिल्हाचा झोन बदलला जाईल. किंवा एखाद्या जिल्ह्यातील एखाद्या भागात, अथवा गावात अचानक रुग्ण वाढले किंवा समोर आले तर त्यांना कन्टेन्मेंट झोन करण्याचे अधिकार ही त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे उद्यापासून जी शिथीलता काही भागात आणली जात आहे, त्याचे योग्य पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी पूर्णपणे जिल्हाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे.

ग्रीन झोन मृत ज्वालामुखी
जे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत ते मृत ज्वालामुखी आहेत, त्यांना जिवंत करू नका आणि ऑरेंज झोनमध्ये आहेत ते निद्रिस्त ज्वालामुखी आहेत, त्यांना जागे करू नका. जे रेडमध्ये आहेत ते जागृत ज्वालामुखी आहेत ते भाग मृत ज्वालामुखी बदलायचे आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

इतर रुग्णांची काळजी घ्या
जिथे इतर प्रकारच्या रुग्णांना उपचार मिळत नसतील तर तातडीने जिल्हाधिकाºयांनी हस्तक्षेप करावा, मानसूनपूर्व कामे करण्याचे नियोजन करा, नाहीतर कोरोनातून बाहेर पडू आणि पुरात सापडू अशी वेळ येऊ देऊ नका अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Web Title: coronavirus 30th april and 15th may will be crucial dates amid covid 19 crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.