Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात लग्न करून फसले; २२ दिवस ३२ जण शाळेतच अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 09:02 AM2020-04-15T09:02:23+5:302020-04-15T09:03:21+5:30
२२ दिवस वऱ्हाडी मंडळींच्या जेवणा-खाण्याची सोय करणं वधूकडच्या लोकांना परवडणारं नाही.
छपरा: लॉकडाऊन असल्यानं लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. लग्न सोहळ्यांवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. लॉकडाऊनच्या काळातील बरीच लग्न रद्द करण्यात आली आहेत. पण काही असेही उत्साही लोक आहेत, त्यांनी या काळातही लग्न सोहळे उरकून घेतले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कोलकात्याहून आलेली ३२ वऱ्हाडी मंडळी बिहारमधल्या छपरा गावात अडकून पडली आहेत. या मंडळींनी पुन्हा कोलकात्यात परतण्याचे भरपूर प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आलं नाही. आता त्यांच्याजवळ दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे नाहीत. मुलीच्या गावातील आजूबाजूचे लोक त्यांना दोन वेळेचं जेवण देत आहेत. कारण वधूचं कुटुंबसुद्धा गरीब आहे. २२ दिवस वऱ्हाडी मंडळींच्या जेवणा-खाण्याची सोय करणं वधूकडच्या लोकांना परवडणारं नाही.
मांझीच्या इनायतपूर गावात कोलकाताहून फिरोज अख्तर लग्नाची वरात घेऊन आले. ज्याचं लग्न खुशबू खातून हिच्यासोबत पारंपरिक पद्धतीनं संपन्न झालं. पण लग्नाच्या पुढच्याच दिवशी २३ मार्चला पूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळे कोलकात्याहून आलेली वऱ्हाडी मंडळी गावातच अडकून पडली. वऱ्हाडी मंडळींमध्ये अनेक महिलांचाही समावेश आहे. मुलीकडच्यांनी या मंडळींची गावातील एका शाळेत व्यवस्था केली आहे. ३२ लोकांना दोन वेळेचं दररोज जेवण देणं हे मुलीकडच्यांच्या आवाक्यातील नाही.
वधूसुद्धा वऱ्हाडी मंडळींबरोबर शाळेत राहत आहे. या कठीण काळात मांझीच्या लोकांनी त्यांना खूप मदत केली आहे. ज्या दिवशी वऱ्हाडी मंडळी गावात आली, लग्न झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना निरोप घ्यायचा होता, परंतु त्याचदरम्यान संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. वरात कोलकाताहून छपरा येथील मांझी येथे मिरवणुकीसाठी आली असता लॉकडाऊनमुळे ट्रेनसह रस्त्यांची वाहतूकही बंद झाली होती. त्यामुळे वधू-वर आणि वऱ्हाडी मंडळींना गावाबाहेरच्या शाळेत ठेवले. वऱ्हाडी मंडळींनी परत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना झारखंडच्या सीमेवरून परत मागे पाठवण्यात आलं.