coronavirus: तब्बल ३३३८ कोरोनाबाधित रुग्ण बेपत्ता? या शहरातील प्रशासनाची वाढली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 11:16 AM2020-07-26T11:16:13+5:302020-07-26T11:18:12+5:30
कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाकडून या रुग्णांचा शोध सुरू आहे. मात्र या रुग्णांची काहीही माहिती अद्याप प्रशासनाला मिळालेली नाही.
बंगळुरू - दररोज वेगाने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे देशासमोर निर्माण झालेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालले आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेले काही रुग्ण आपल्या बेजबाबदारपणातून संसर्गाचा धोका वाढवत असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला कोराना नियंत्रणात असलेल्या बंगळुरूमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढी आहे. त्यातच बंगळुरूमध्ये कोरोनाचे ३ हजार ३३८ असे रुग्ण आहेत ज्यांची प्रशासनाकडे कुठलीही माहिती नाही आहे.
कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाकडून या रुग्णांचा शोध सुरू आहे. मात्र या रुग्णांची काहीही माहिती अद्याप प्रशासनाला मिळालेली नाही. याचं कारण म्हणजे या रुग्णांनी कोरोनाची चाचणी करताना फॉर्ममध्ये चुकीची माहिती जमा केली होती. कोरोनाचा अर्ज भरताना विविध माहिती भरून घेतली जाते. ज्यामध्ये रुग्णाचा पत्ता, मोबाइल क्रमांक आधींचा समावेश असतो. मात्र अनेक रुग्णांनी फॉर्मवर आपला पत्ता अर्धवट लिहिला. तसेच मोबाईल क्रमांकसुद्धा चुकीचा लिहिला. त्यामुळे लोकांची माहिती मिळत नाही आहे, असे बीबीएमपीचे आयुक्त मंजुनाथ यांनी सांगितले.
गेल्या एक आठवड्यात रुग्णांची संख्या वेगाने वाढल्याने बंगळुरूमधील प्रशासनाने कोरोनाबाबतची सक्ती खूप वाढवली आहे. देशातील आठ शहरांमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. या शहरांमध्ये बंगळुरूचा समावेश आहे. दरम्यान, दिल्ली, मुंबई, चेन्नई, पुणे, ठाणे, अहमदाबाद, बंगळुरू (शहरी) आणि कोलकाता या शहरांचा कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेल्या शहरांचा समावेश आहे. पैकी, पुणे आणि बंगळुरूमध्ये परिस्थिती खूप खराब आहे.
देशातील इतर शहरांची तुलना करून पाहिल्यास पुणे आणि बंगळुरूही अशी शहरे आहेत. जिथे कोरोनाच्या रिकव्हरी रेटपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहे. बंगळुरूमध्ये रिकव्हरी रेट हा २३ टक्के आहे. तर कोरोनाच्या रिकव्हरी रेटची राष्ट्रीय सरासरी ही ६० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे बंगळुरूमध्ये कोरोविरोधातील लढाई बिकट झाली आहे.