Coronavirus: चालत्या ट्रेनमधून ३३८ मजूर बेपत्ता झाल्यानं खळबळ; शोधमोहिमेत प्रशासनाची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 01:59 PM2020-05-14T13:59:50+5:302020-05-14T14:01:44+5:30
बांदा जिल्हा प्रशासन या प्रकरणाच्या चौकशीत व्यस्त आहे. बुधवारी वडोदरा येथून आलेल्या प्रवासी मजुरांसह ही ट्रेन बांदाला आली. या ट्रेनमध्ये उत्तर प्रदेशमधील ४८ जिल्ह्यांतील १९०८ मजूर थर्मल स्क्रिनिंगनंतर बसवण्यात आले होते
बांदा – प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या श्रमिक विशेष गाड्या यूपीच्या विविध भागात पोहोचत आहेत. मात्र गुजरातच्या वडोदरा येथून आलेल्या एका ट्रेनमधून ३३८ मजूर बेपत्ता असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. वडोदरा येथून श्रमिक स्पेशल १९०८ मजुरांना घेऊन सोडण्यात आली होती. परंतु जेव्हा ही गाडी बांदा रेल्वे स्थानकावर आली तेव्हा केवळ १५७० मजूर उतरले. अशा परिस्थितीत ३३८ मजूर कोठे बेपत्ता झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे मजूर गेले कुठे? ते वाटेवर दुसर्या स्टेशनवर उतरले आहेत का? याची चिंता प्रशासनाला लागली आहे.
४८ जिल्ह्यातील १९०८ मजूर बसले होते?
बांदा जिल्हा प्रशासन या प्रकरणाच्या चौकशीत व्यस्त आहे. बुधवारी वडोदरा येथून आलेल्या प्रवासी मजुरांसह ही ट्रेन बांदाला आली. या ट्रेनमध्ये उत्तर प्रदेशमधील ४८ जिल्ह्यांतील १९०८ मजूर थर्मल स्क्रिनिंगनंतर बसवण्यात आले होते. परंतु बांदा स्थानकात एकूण १५७० मजूर ट्रेनमधून खाली उतरले तेव्हा प्रशासनात खळबळ माजली. मजुरांना पाठवण्यासोबत वडोदराचे एडीएम डीआर पटेल यांनी बांदा जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून सर्व कामगारांची माहिती व संख्या नमूद केली. ट्रेनमधून ३३८ मजूर बेपत्ता झाल्याने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. इतके मजूर गेले कुठे? त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागत नाही. यासंदर्भात बांदा जिल्हा प्रशासनाने वडोदरा प्रशासनाकडे संपर्क साधला आहे. हरवलेल्या मजुरांचा शोध घेण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत.
या प्रकरणी चित्रकूटधाम मंडळ बांदाचे आयुक्त गौरव दयाल म्हणतात की, आम्ही वडोदरा प्रशासनाशी संपर्क साधून माहिती गोळा करत आहोत. श्रमिक ट्रेनमध्ये ३३८ प्रवाशी कमी बसलेच नाहीत हेदेखील शक्य आहे किंवा यादीमध्ये चूक असू शकते. प्रमाणानुसार २२ डब्ब्यांच्या गाडीत १९०८ मजूर बसू शकत नाहीत. ही यादी तयार करण्यात चूक झाली असण्याची शक्यता जास्त आहे. तरीही आम्ही त्याचा तपास करीत आहोत असं ते म्हणाले.
देशाच्या इतर राज्यांत रोजीरोटीसाठी गेलेल्या मजुरांना परत आणण्याच्या मोहिमेत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. बुधवारपर्यंत ३०१ विशेष गाड्या उत्तर प्रदेशातील मजुरांना घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यात पोहोचल्या आहेत. सुमारे ३.६१ लाख मजूर त्यांच्या घरी परतले आहेत. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गुजरात यासह अनेक राज्यांतून यूपीमधील कामगारांसाठी विशेष गाड्या सातत्याने धावत आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...तर येत्या ६ महिन्यात ५ लाखांहून जास्त एड्स रुग्णांचा मृत्यू; WHO चा धक्कादायक रिपोर्ट
आयुष्यात ‘ती’ गोष्ट जिव्हारी लागली; एमबीबीएस डॉक्टर थेट IAS अधिकारी बनली!
विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
अर्थमंत्र्यांची घोषणा ५.९४ लाख कोटींची पण सरकारी खिशातून आता फक्त ५६,५०० कोटी जाणार!
...म्हणून ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा; शिवसेनेची मोठी मागणी