Coronavirus: देशात ४ लाखांवर सक्रिय रुग्ण, गेल्या २४ तासांत ४१ हजार कोरोना रुग्ण; केरळमुळे काळजी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 05:30 AM2021-08-01T05:30:45+5:302021-08-01T05:31:14+5:30
३ कोटी १६ लाख १३ हजार ९९३ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ७ लाख ८१ हजार २६३ जण बरे झाले.
नवी दिल्ली : देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये सलग चौथ्या दिवशी वाढ झाली असून, त्यात केरळमधील रुग्णांचीच संख्या अधिक आहे. बरे होणाऱ्यांपेक्षा संक्रमितांचा आकडा जास्त आहे. या स्थितीने चिंता आणखी वाढली आहे. गेल्या चोवीस तासांत देशामध्ये ४१ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले.
३ कोटी १६ लाख १३ हजार ९९३ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ७ लाख ८१ हजार २६३ जण बरे झाले. गेल्या चोवीस तासांत ३७,२९१ जण बरे झाले असून, ५९३ जणांचा मृत्यू झाला. बरे झालेल्यांपेक्षा नव्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. आजवर ४ लाख २३ हजार ८१० जणांचा मृत्यू झाला आहे. ४ लाख ८ हजार ९२० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यामध्ये केरळच्या १ लाख ६२ हजार रुग्णांचा समावेश आहे.
दररोज २० हजार रुग्ण
- केरळमधील कोरोना स्थिती आणखी बिघडली आहे. त्यामुळे तिथे शनिवारपासून संपूर्ण लॉकडाऊन सुरू झाला असून, तो आज, रविवारीही लागू राहाणार आहे. सध्या त्या राज्यात दररोज २० हजारांवर रुग्ण आढळत आहेत.
- केरळमधील कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या मदतीला केंद्र सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल या संस्थेतील सहा तज्ज्ञांचे पथक पाठविले आहे. एकट्या केरळमध्ये कोरोनाचे ३३ लाख रुग्ण आहेत.
- इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सांगितले की, आतापर्यंत कोरोना लसीचे ४६ कोटी १५ लाख १८ हजार ४७९ डोस नागरिकांना देण्यात आले आहेत.