CoronaVirus : चार वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण; खोकला, सर्दीसह पोटात भरले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 11:56 AM2021-07-14T11:56:38+5:302021-07-14T11:57:20+5:30
CoronaVirus : या मुलाचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच, या मुलाच्या कुटुंबीयांची आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे.
नोएडा : जवळपास एक महिन्यानंतर मंगळवारी नोएडा येथील चाइल्ड पीजीआयमध्ये चार वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्यामुळे दाखल करण्यात आले. या मुलामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर कुटुंबांनी त्याची तपासणी केली. यावेळी चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर या मुलाला सेक्टर-29 मधील भारद्वाज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचारांसाठी येथील सेक्टर-30 मधील सुपर स्पेशालिटी पेडियाट्रिक अँड पोस्ट ग्रॅज्युएट टीचिंग इन्स्टिट्यूट (चाइल्ड पीजीआय) येथे पाठविण्यात आले.
बर्याच दिवसानंतर कोरोनाची लागण झालेला लहान वयाचा रुग्ण आढळल्यामुळे रुग्णालय आणि आरोग्य विभागही सतर्क झाले आहे. या मुलाचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच, या मुलाच्या कुटुंबीयांची आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. चाइल्ड पीजीआयच्या संचालक डॉ. ज्योत्स्ना मदन यांनी सांगितले की, मुलाला दुपारी एक वाजेच्या सुमारास रुग्णालयात आणले गेले, त्यानंतर त्याची आपत्कालीन परिस्थिती पाहता त्याला वॉर्डात दाखल करण्यात आले. मुलाला तीव्र ताप, खोकला आणि सर्दी आहे. तसेच, पोटात पाणी भरले आहे.
लोक मास्क लावण्यास का टाळाटाळ करतात? 'ही' आहेत तीन कारणं... https://t.co/SWbCxj3NoT#Coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) July 14, 2021
दिलासादायक बातमी अशी आहे की, या मुलाची ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात आहे. मुलाची काळजी घेण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या मुलाला झालेल्या कोरोनाचा व्हेरिएंट शोधण्यासाठी त्याचे नमुने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) चाचणी प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे. दरम्यान, मंगळवारी येथील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात कोरोनाचे पाच नवीन रुग्ण आढळले, तर पाच रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. सध्या जिल्ह्यात 41 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुलांमध्ये कोरोनाची कोणती लक्षणे दिसून येतात?
ताप, खोकला, श्वास लागणे, थकवा, घसा खवखवणे, अतिसार, गंध कमी होणे, चव कमी होणे, जठरासंबंधी आजाराची लक्षणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, कोरडा खोकला आणि स्नायू दुखणे यांसारखी लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून येतात. मुलांमध्ये ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डेल्टा व्हेरिएंटचा 104 देशांमध्ये संसर्ग; लवकरच संपूर्ण जगात पसरण्याची WHO कडून चिंता https://t.co/rhQ0enylz6#coronavirus#Delta
— Lokmat (@MiLOKMAT) July 14, 2021
डेल्टा व्हेरिएंटचा 104 देशांमध्ये संसर्ग - जागतिक आरोग्य संघटना
कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट जगातील जवळपास 104 देशांमध्ये पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी ही माहिती दिली आहे. या वेगाने पसरणार्या व्हेरिएंटमुळे (Coronavirus Variant) मृत्यू आणि संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हा व्हेरिएंट लवकरच जगभरात पसरू शकतो, असे ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी म्हटले आहे. डेल्टा आणि इतर वेगवान संसर्ग होणाऱ्या व्हेरिएंट प्रकरणांची विनाशकारी लहर चालत आहे, ज्यामुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची भरती आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. केवळ सार्वजनिक आरोग्य उपायांसह व्हायरसच्या सुरुवातीच्या लाटेंचा प्रतिकार करणाऱ्या देशांमध्ये आता उद्रेक झाला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणाले.