CoronaVirus ४० कोटी कामगार दारिद्र्याच्या खाईत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 05:18 AM2020-04-09T05:18:45+5:302020-04-09T05:19:01+5:30
असंघटीत कामगार : आयएलओला चिंता
जीनिव्हा : आधीच हातावर पोट असलेले भारतीय अर्थव्यवस्थेच्या असंघटित क्षेत्रांमधील सुमारे ४० कोटी मजूर व कामगार सध्याच्या कोरोना संकटामुळे आणखी दारिद्र्याच्या खाईत लोटले जातील, अशी चिंता संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) व्यक्त केली आहे.
कोरोनामुळे सुरु असलेल्या प्रदीर्घ ‘लॉकडाऊन’मुळे जगभरातील सुमारे २.७ अब्ज हंगीमा कामगारांची रोजीरोटी बंद झाल्याचा अंदाज संघटनेने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात वर्तविला. भारत, नायजेरिया व ब्राझिलमधील कामगारांना याची सर्वाधिक झळ पोहोचली आहे. भारतात एकूण श्रमशक्तीच्या ९० टक्के हिस्सा असंघटित कामगारांचा असून, सरकारने काही मदतीचे उपाय योजले नाहीत तर असे सुमारे ४० कोटी कामगार आणखी दारिद्र्याच्या खाईत लोटले जाऊन त्यांच्यापुढे कुटुंबाचे पोट भरण्याची गंभीर भ्रांत निर्माण होऊ शकेल. (वृत्तसंस्था)
संघटना म्हणते : ही महामारी आधीच्या ठिकाणी अधिक तीव्र होऊन नव्या देशांमधये पसरत चालल्याने जगभरातील एकूण श्रमशक्तीच्या ८१ टक्के म्हणजे २.७ कोटी कामगार - कर्मचाऱ्यांच्या चरितार्थास फटका बसला आहे. अनेक देशांमध्ये ‘लॉकडाऊन’ व अन्य निर्बंध दीर्घकाळ असेच सुरु राहिले तर चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्पादक श्रमतासांमध्ये सुमारे ६.७ टक्क्यांनी घट होईल. असे होणे म्हणजे पूर्णवेळ कामधंदा असलेल्या १.९५ कोटी लोकांनी रिकामे घरी बसण्यासारखे आहे.
अहवाल म्हणतो : विविध देशांमधील ‘लॉकडाऊन’मुळे जे उद्योग बंद किंवा अर्धवट क्षमतेने चालत आहेत व जेथे कामगार कपातीची शक्यता आहे अशा उद्योगांमध्ये जगातील एकूण श्रमशक्तीच्या ३८ टक्के
म्हणजे सुमारे १.२५ अब्ज कामगार-कर्मचारी आहेत. रिटेल व्यापार, कारखानदारी, घरबांधणी, कॅटरिंग व अन्नपुरवठा, वाहतूक आणि आदरातिथ्य या उद्योगांना सर्वाधिक झळ पोहोचली आहे.