Coronavirus: ४२५ भारतीय विद्यार्थी अडकले परदेशात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 02:56 AM2020-04-20T02:56:07+5:302020-04-20T02:57:00+5:30
पंतप्रधानांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पालकांचे साकडे
ठाणे : भारतातील ४२५ विद्यार्थी युनायटेड किंग्डममध्ये अडकून पडले आहेत. त्यात ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कावेसर येथील रहिवासी असलेले शशी यादव यांच्या मुलाचाही समावेश आहे. तिथे कोणत्याही वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने त्यांना तातडीने भारतात आणण्यासाठी यादव यांनी पंतप्रधानांसह राज्याचे मुख्यमंत्री आणि आमदार- खासदारांना साकडे घातले आहे.
लॉकडाऊनमुळे हे ४२५ भारतीय विद्यार्थी युनायटेड किंगडममध्ये अडकून पडले आहेत. ठाण्यातील शशी यादव यांचा मुलगा विशाल याला गेल्या आठवड्यात त्वचेचा आजार झाला होता. त्यावेळी तेथील औषधी दुकानदारांनी त्याला कोणतेही औषध दिले नाही. डॉक्टरांनीही वेळ न देता त्याला आधी नोंदणी करण्यास सांगितले. नावनोंदणीस गेल्यावर तेथील यंत्रणा वेळ देत नाही. अशावेळी तो आजार अंगावर काढत आहे. एखादा मोठा आजार झाल्यावरही तेथील सरकार मदत करणार नाही का, ही बाब आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने तेथील सरकारच्या निर्दशनास आणून द्यावी, किमान त्यांची वैद्यकीय तपासणीची तरी व्यवस्था करावी, अशी मागणी करताना सर्वांना लवकरात लवकर भारतात आणण्याची मागणी यादव यांनी केली आहे.