CoronaVirus: दिलासादायक! ४५ जिल्ह्यांमध्ये नवा रुग्ण नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 04:39 AM2020-04-19T04:39:30+5:302020-04-19T06:51:46+5:30
एकूण रुग्णसंख्या १५ हजार ७२२ वर
नवी दिल्ली : देशात १९९२ कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी ९९१ जणांना याची लागण झाल्याने रुग्णसंख्या १५ हजार ७२२ वर पोहोचली असून ५२० जणांचा मृत्यू झाला. ४३ मृत्यूंची नोंद शुक्रवारी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली. २३ राज्यांमधील ४५ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. ३ जिल्ह्यांमध्ये १४ दिवसांनी कोरोनाचा नवा रुग्ण आढळला आहे.
भारतात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण ३.३ टक्के आहे. सर्वाधिक ७५ टक्के मृत्यू ६१ पेक्षा जास्त वय असलेल्यांमध्येच आहे. ६१ ते ७५ वयोगटात ३३.१ तर ७५ पेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण ४२.२ टक्के आहे. ० ते ४५ टक्के वयोगटात १४.४, ४५ ते ६० वयोगटात १०.३ टक्के मृत्यूचे प्रमाण आहे. पूर्वव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण ८३ टक्के आहे.
हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचे साइड इफेक्ट
आरोग्य क्षेत्रातील अनेकांनी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषध घेतले. अनेकांना त्यामुळे साईड इफेक्ट्स दिसल्याने सरकारची चिंता वाढली असल्याचे आयसीएमआरचे संशोधक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले.
एचसीक्यू औषध घेतलेल्या १० टक्के डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पोटात दुखण्यासारखी लक्षणे दिसली. तर ६ टक्केंमध्ये उलटी होणे, हायपोग्लेसमिया प्रकर्षाने जाणवल्याचे त्यांनी नमूद केले.