coronavirus: देशातील ५ लाख रुग्ण झाले बरे, २.७६ लाख रुग्णांवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 04:43 AM2020-07-11T04:43:37+5:302020-07-11T04:44:01+5:30
एकीकडे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढत असली तरी नवीन रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. भारतात आज २६ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
नवी दिल्ली : देशातील कोविड-१९ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ६२.४२ टक्के झाले आहे. आतापर्यंत ४ लाख ९५ हजारांवर रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर २ लाख ७६ हजार ८८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर दररोज सरासरी ४०० रुग्णांचा मृत्यू होत आहे.
एकीकडे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढत असली तरी नवीन रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. भारतात आज २६ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. वैद्यकीय तपासण्यांचे प्रमाण वाढल्याने रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात आल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे; परंतु दिवसागणिक मृत्यूसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी ४०० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे बळी जात आहे. रुग्णांच्या मृत्यूची संख्या २२ हजारांपर्यंत पोहोचली आहे.
फायझरची प्रतिबंधक लस येत्या हिवाळ्यात
वॉशिंग्टन : फायझर कंपनी येत्या हिवाळ््यापर्यंत कोरोनावरील प्रतिबंधक लस बनविण्याची व वितरित करण्याची शक्यता आहे असा दावा या औषध कंपनीचे सीइओ अल्बर्ट बोऊर्ला यांनी केला आहे. ही लस बनविण्याच्या प्रकल्पावर फायझर कंपनी १ अब्ज डॉलर खर्च करणार आहे. या लसीचे २ कोटी डोस बनविता यावे यासाठी चार प्लांट फायझर सुरू करणार आहे.
लसीचा तातडीने वापर करण्यास अमेरिकी सरकार येत्या आॅक्टोबर महिन्यात परवानगी देईल अशी आशा अल्बर्ट बोऊर्ला यांनी व्यक्त केली आहे.