CoronaVirus News: थिएटर्ससह सण-समारंभांनाही सशर्त संमती; धार्मिक स्थळे कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 06:15 AM2020-10-07T06:15:25+5:302020-10-07T06:38:50+5:30
CoronaVirus News Unlock Guidelines for theaters: केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जाहीर; चित्रपटगृहांमध्ये निम्मीच आसने उपलब्ध
नवी दिल्ली/मुंबई : देशात १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून नवे नियम व अटींचे पालन मालक/चालकांना करावे लागणार आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर सण-समारंभाच्या आयोजनालाही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी ही घोषणा केली व चित्रपटगृहांसाठीची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स सांगितली. सात महिन्यांनंतर चित्रपटगृहे खुली होत असून, याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. आता धार्मिक स्थळे कधी उघडणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कंटेनमेंट झोनबाहेर सण साजरे करता येणार
देशात आॅक्टोबर ते डिसेंबरपर्यंत विविध उत्सव असतात. ते कंटेनमेंट झोनबाहेर साजरे करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी भरपूर जागा, डिस्टन्सिंगसाठी योग्य प्रकारे मार्किंग केलेली असावी. तसेच मूर्तींना किंवा पवित्र धर्मग्रंथांना स्पर्श करण्याची परवानगी देता कामा नये. अशा ठिकाणी कोरोनाची लक्षणे नसणारांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
त्यातही मास्क, डिस्टन्सिंग आदी नियम पाळावे लागणार आहेत. कोरोनाचा फै लाव रोखण्यासाठी या उपाययोजना करण्यात येणार आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपापल्या घरांमध्येच उत्सव साजरे करावेत, घराबाहेर पडू नये, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत देशात विविध धार्मिक पूजा, जत्रा, सांस्कृतिक उपक्रम, मिरवणुका आदी कार्यक्रम एका दिवसाचे, आठवड्याचे किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचे साजरे केले जातात. रेकॉर्डेड धार्मिक गाणी, संगीत ऐकवता येईल. मात्र, सामुदायिक गाण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही.
अट : मास्क घालावाच लागेल
क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश
एक आसन सोडून बसावे लागेल
हवा खेळती असली पाहिजे
एसीचे तापमान २३ अंश सेल्सिअसच्या वर ठेवावे लागेल