Coronavirus : नागावमधील ५०० कॉटेज, हॉटेल्स बंद, पर्यटन व्यवसायावर कोरोना व्हायरसची संक्रांत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 03:22 AM2020-03-19T03:22:17+5:302020-03-19T03:22:38+5:30

जगभरात कोरोनाच्या विषाणूने चांगलाच हाहाकार उडवून दिला आहे. आतापर्यंत १६३ देशांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

Coronavirus: 500 cottage in Nagaon, hotels closed, corona virus infected on tourism business | Coronavirus : नागावमधील ५०० कॉटेज, हॉटेल्स बंद, पर्यटन व्यवसायावर कोरोना व्हायरसची संक्रांत

Coronavirus : नागावमधील ५०० कॉटेज, हॉटेल्स बंद, पर्यटन व्यवसायावर कोरोना व्हायरसची संक्रांत

Next

- निखिल म्हात्रे

अलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रायगड जिल्हा विशेषत: अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. येथील नागावची ओळख कॉटेजचे गाव अशी आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच पर्यटकांचा राबता असतो. गो कोरोना...गो... यामाध्यमातून नागाव परिसरातील तब्बल ५०० कॉटेज, हॉटेल्स आणि परमिट रूम बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील रोजगारावर कोरोना व्हायरसची संक्रांत आल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.
जगभरात कोरोनाच्या विषाणूने चांगलाच हाहाकार उडवून दिला आहे. आतापर्यंत १६३ देशांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्याचा आकडा वाढत आहे. एक लाख ९६ हजार ७२३ हून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी सात हजार ९२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे ८१ हजार ६८३ कोरोनाग्रस्त बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरानाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने चीन या देशाला झाला आहे. त्यापाठोपाठ इटली, इराण, स्पेन आणि द. कोरिया यांना जास्त फटका बसला आहे.
जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्र सरकारनेही याबाबत तातडीने पावले उचलली आहेत. गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन सातत्याने राज्य तसेच जिल्हा पातळीवरून करण्यात येत आहे. कोरोनाबाबत सतर्कता हाच प्रामुख्याने आणि मोठा उपाय असल्याचे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य सरकारने १९९७ सालच्या साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, पर्यटनस्थळे, जलतरण तलाव, जिम, शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवण्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरकारी कार्यक्रम, सभा, समारंभ अशा कार्यक्रमांवरही बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात पर्यटनावर आधारित विविध व्यवसाय आहेत. त्यामुळे या ठिकाणी देशी-परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांनाही आता मज्जाव करण्यात आला आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव येथे मोठ्या संख्येने कॉटेजेस, रेस्टारंट, हॉटेल्स आणि परमिट रूम आहेत, त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने अशा व्यवसायांवर बंदी घालणे गरजेचे
होेते.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने नागाव ग्रामपंचायतीने लॉजेस, हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिक यांची बैठक घेऊन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लॉजेस, रिसॉर्ट बंद करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला हॉटेल व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला आहे. सुमारे ५०० हॉटेल्स, लॉज, कॉटेजेस, रेस्टारंट बंद केली आहेत. त्यामुळे गजबजलेला नागाव परिसर हा सुनासुना झाला आहे, तर येणाऱ्या तुरळक पर्यटकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे.

जिल्ह्यात पर्यटनाला मोठा फटका
जिल्ह्यातील पर्यटनाला कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसू लागला आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनारे ही आता निर्मनुष्य दिसू लागले आहेत. नेहमी गजबजलेले नागाव सध्या पर्यटकांविना सुनेसुने झाले आहे. शनिवार, रविवार आणि सलग लागून सुट्ट्या आल्या की मुंबई, पुणे, ठाणे येथून नागाव समुद्रकिनाºयावर पर्यटक मजा करण्यासाठी वाहनाने आणि जलवाहतुकीने येत असतात. त्यामुळे नागाव व आजूबाजूचा परिसर समुद्रकिनारे, हॉटेल्स, लॉजेस, रिसॉर्टही पर्यटकांनी गजबजून जातात. पर्यटकांमुळे स्थानिकांचा व्यवसाय तेजीत असतो. मात्र, कोरोना विषाणूमुळे सध्या पर्यटन व्यवसायाला घरघर लागली आहे. त्यावर आधारित असणारे व्यावसायिक चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहेत.

नागाव समुद्रकिनाºयावर पर्यटकांचा ओढा वाढला आहे. वीकेण्डला हजारो पर्यटक मौजमजेसाठी येथे येत असतात. मात्र, सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता ३१ मार्चपर्यंत नागाव गावातील ग्रामस्थांना आपापले कॉटेज व हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी या मोहिमेला पाठिंबा देत सुमारे ५०० कॉटेज, हॉटेल्स बंद ठेवले आहेत.
- निखिल मयेकर, नागाव, सरपंच

प्रशासनाचा निर्णय योग्य
जिल्ह्यातील अलिबाग, मुरु ड, श्रीवर्धन या ठिकाणच्या सर्वच समुद्रकिनारी हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा फटका हा पर्यटन व्यवसायाला बसू लागला आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांच्या आरोग्य दृष्टीने घेतलेला जिल्हा प्रशासनाचा निर्णय हा योग्य असल्याचे मत हॉटेल व्यावसायिक दिनकर कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Coronavirus: 500 cottage in Nagaon, hotels closed, corona virus infected on tourism business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.