coronavirus: ट्रिपल टेस्टिंग, आयसोलेशनसाठी रेल्वेचे ५०० कोच; देशाच्या राजधानीला कोरोनामुक्त करण्यासाठी केंद्राने कंबर कसली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 04:20 PM2020-06-14T16:20:25+5:302020-06-14T16:23:38+5:30
कोरोनामुळे दिल्लीत निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी चर्चा केली आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोनामुळे दिल्लीत निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी चर्चा केली आहे. या बैठकीनंतर देशाच्या राजधानीला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी अमित शाह यांनी व्यापक अँक्शन प्लॅनची घोषणा केली आहे.
या बैठकीनंतर अमित शाह यांनी सांगितले की, देशाच्या राजधानीला कोरोनाच्या संकटापासून रोखण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. दिल्लीत कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पुढील दोन दिवसांत कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवून दुप्पट केले जाईल. तर सहा दिवसांनंतर हे प्रमाण तिप्पट केले जाईल.
वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील कंटेन्मेंट झोनमधील प्रत्येक मतदान केंद्रावर कोविड-१९ चा तपास केंद्र सुरू केले जाईल. तसेच संसर्ग झालेल्यांचा शोध घेण्यासाठी हॉटस्पॉट भागांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी बेड्सची कमतरता भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार दिल्लीला रेल्वेचे ५०० कोच उपलब्ध करून देणार आहे, अशी माहितीही अमित शाह यांनी दिली.
Modi govt is committed to control spread of #COVID19 in Delhi. Today, several important decisions were taken to protect people of Delhi & to prevent this infection, in the meeting held with Health Minister Dr Harsh Vardhan, Delhi LG Anil Baijal & CM Arvind Kejriwal: HM Amit Shah pic.twitter.com/1vNcW8eFr7
— ANI (@ANI) June 14, 2020
तसेच कोरोनामुळे वाढत असलेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कारांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येतील. त्याबरोबरच कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी दिल्लीला अजून पाच वरिष्ठ अधिकारी देण्याचा निर्णय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाच्या नव्या रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा ३९ हजारांवर पोहोचला आहे. तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.