Coronavirus: खायला अन्न नाही मग ८ दिवसाच्या मुलीला दूध कसं पाजणार?; एका हतबल आईची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 03:57 PM2020-04-14T15:57:12+5:302020-04-14T16:02:45+5:30
ही कहाणी फक्त एका महकची नाही तर तिच्या जवळच उभी असणारी बिहारच्या नवादा येथे राहणाऱ्या चांदराणीची परिस्थिती बिकट आहे.
नवी दिल्ली – देशभरात लॉकडाऊन वाढवल्यामुळे दिल्ली आणि परिसरात अडकलेल्या लाखो मजुरांचे हाल आणखी वाढले आहेत. या संकटाच्या काळात फसलेल्या या मजुरांना दिवसांतून एकवेळचं जेवणही मिळणं कठीण झालं आहे. कोरोनापेक्षा आम्ही भूकेनेच मरू अशी अवस्था या मजुरांनी मांडली आहे.
लॉकडाऊन काळात महक नावाच्या एका महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. हॉस्पिटलला जाण्यासाठी पैसे नाहीत किंवा वाहन व्यवस्थाही नाही. २२ वर्षाची महक आणि तिचा पती गोपाळ उत्तराखंड येथील नैनीतालच्या एका गावात राहतात. जुनी दिल्ली येथील टाऊनहॉल परिसरात एका इमारतीच्या बांधकामासाठी ते मजूर म्हणून काम करत होते. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व बंद पडलं. महकने सांगितलं की, दोन दिवसात एकावेळचं जेवण आमच्या नशिबात आहे. मुलीला पाहून वडिलांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाही. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना महक म्हणाली की, एका हातात मावेल एवढा भात खाल्ला आहे. दूध कसं येणार? मुलीला कसं जगवणार? असा आक्रोश आई महक व्यक्त करत आहे.
ही कहाणी फक्त एका महकची नाही तर तिच्या जवळच उभी असणारी बिहारच्या नवादा येथे राहणाऱ्या चांदराणीची परिस्थिती बिकट आहे. एका झोपडीत थोड्या प्रमाणात भात आहे त्यातूनच तिच्या ४ लहान मुलांची भूक मिटवायची आहे. ती करनालच्या एका भट्टीत पती मदनसह मजुरीचं काम करते. पायपीट करुन तीचं कुटुंब कसंतरी दिल्लीत पोहचलं आहे. याठिकाणी एका झोपडीत ती राहते.
दिल्ली सरकार सर्व रेशनकार्ड धारकांना रेशन देत आहे मात्र अनेक प्रवासी मजूर ज्यांच्याकडे दिल्लीचं रेशनकार्ड नाही त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या मजुरांची नोंदणी करण्यासाठी वेबसाईट बनवण्यात आली मात्र तीन दिवसांपासून ती वेबसाईटही बंद पडली आहे. जुनी दिल्ली रेल्वे स्टेशन परिसरातील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या बिहारच्या सीवान जिल्ह्यातील शंकर कुमारने त्याच्या सहकाऱ्यासह खाली पाकीट दाखवत सांगितले की, पैसे संपले आहेत. रेशन पण संपत आलं आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्ली सरकारकडून एका शाळेत जेवण दिलं जात असल्याचं समजताच त्याठिकाणी जाण्यास निघालो. तेव्हा पोलिसांनी लाठी मारुन हाकलवून दिलं अशी व्यथा त्यांनी मांडली.