CoronaVirus: ८० कोटी गरिबांना प्रत्येकी ५ किलो मोफत अन्नधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 06:21 AM2021-04-24T06:21:54+5:302021-04-24T06:22:07+5:30
CoronaVirus: केंद्राचा मदतीचा हात; मे, जूनसाठी योजना. अशाच प्रकारची मदत केंद्र सरकारतर्फे गेल्या वर्षीही गरीब कुटुंबांना करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविल्याने नागरिकांचे जीणे असह्य बनले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील ८० कोटी गरीब जनतेला मे व जून महिन्यात मोफत अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. प्रत्येक लाभार्थीला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून दरमहा ५ किलो अन्नधान्य मोफत देण्यात येईल.
यासंदर्भात केंद्र सरकारने निवेदनात म्हटले आहे की, ८० कोटी लोकांना दोन महिने मोफत अन्नधान्य देण्यासाठी २६ हजार कोटींपेक्षा जास्त निधी खर्च होणार आहे. अशाच प्रकारची मदत केंद्र सरकारतर्फे गेल्या वर्षीही गरीब कुटुंबांना करण्यात आली होती.
केंद्रीय अन्न मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीने अर्थव्यवस्थेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचा फटका देशातील गरीब तसेच गरजू लोकांना बसत आहे. त्यांचे होणारे हाल कमी करण्यासाठी मे व जून महिन्यात गरीब लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या योजनेच्या लाभार्थींना तांदूळ, गहू यासारखे ५ किलो धान्य पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना देशातील गरिबांना पोटाला पुरेल इतके पौष्टिक अन्न मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातूनच मोफत अन्नधान्य वाटपाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मोदी सरकारने म्हटले आहे.
पुनरावृत्ती नको
n कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक घातक आहे. त्यामुळे अनेक राज्यांत निर्बंधांमुळे उद्योग व्यवसायावरही विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे रोजगार गमावल्याने गरिबांचे हाल होत आहेत.
n पहिल्या लाटेत स्थलांतरित मजुरांना भोगाव्या लागलेल्या हालअपेष्टांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनही आम्ही सतर्क आहोत, असा मोदी सरकारचा दावा आहे.